खबरदार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना नाहक टार्गेट कराल तर.....!
केज तहसिल कार्यालयातील कर्मचारी प्रकरणी दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निवेदन
गौतम बचुटे । केज
येथील तहसील कार्यालयातील महिला पेशकार यांना काही राजकीय व्यक्ती विनाकारण त्रास देत आहेत. त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध तक्रारी देत असल्याची दखल दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने घेत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले आहे. त्यात मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची नाहक बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तहसील कार्यालयात प्रधानमंत्री किसान योजना विभागात पेशकार म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती दिपा कोरडे यांची पूर्वीच्या संजय गांधी निराधार योजना विभागात अचानक बदली करण्यात आली. त्या प्रधामंत्री किसान योजना विभागात चांगल्या प्रकारे त्यांचे कर्तव्य निभावत आहेत. परंतु त्यांनी बोगस लाभार्थ्याना सूक्ष्म तपासणी करून त्यांची नावे कमी केली. ही बाब तालुक्यातील काही राजकारणी मंडळी आणि त्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या दलालांना खटकली आहे.
त्यामुळे त्यांनी खोटे-नाटे कामे करून घेण्यासाठी त्या सहकार्य करीत नसल्यामुळे दिपा कोरडे यांच्या विरोधात तक्रारी देणे सुरू केले आहे. त्यांची नाहक बदनामी करण्याचा कट केलेला आहे. याची दखल दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने घेतली आहे. पेशकार दिपा कोरडे यांना नाहक बदनाम करणाऱ्या राजकीय लोकांची कसून चौकशी करण्यात यावी. आणि जर अशा प्रकारे तालुक्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कोणी त्रास देत असतील तर त्यांना जशाच तसे व त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देऊ. अशा प्रकारचे निवेदन दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांसह तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनावर अजय भांगे, अशोक गायकवाड, लखन हजारे, योगेश गायकवाड आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments