Breaking News

भाजपचे मस्के, आ.मेटे, जयदत्त क्षीरसागरांच्या गटाला धक्का


आ.संदिप भैय्या क्षीरसागर गटाचे पालवनचे दोन सदस्य बिनविरोध

बीड :- प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या पालवनच्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांनी एकत्र येत अभद्र युती करून उभ्या केलेल्या पॅनलला चांगलाच धक्का बसला असून यांच्यातील दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आ.संदिप भैय्या क्षीरसागर गटाचे दोन सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. 
बीड तालुक्यातील पालवन ग्रामपंचायत निवडणुक मोठी रंगात आली आहे. या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे, सेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांनी अभद्र युती करून पॅनल उभे केले आहे. दररोज एकमेकांच्या विरोधात राजकीय भाष्य करणारे पालवनच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एकाच पॅनलमध्ये एकत्र आले आहेत. या पॅनलमधील दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे दोन सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज हा इनकॅमेरा मागे घेतला आहे. निवडणुक विभागाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी पालवनच्या वार्ड क्र.3 मध्ये दोन सदस्य बिनविरोध असल्याची घोषणा करून तसे अधिकृत नोटीस नोटीस बोर्डावर लावली आहे. 

आ.संदिप क्षीरसागरांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन
पालवन येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सदस्य बिनविरोध झाल्यानंतर विरोधकांनी त्या ठिकाणचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर याबाबतची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यातील विजयी उमेदवारांचे आ.संदिप क्षीरसागर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

दोघांनी इनकॅमेरा उमेदवारी अर्ज मागे घेतला
एका वेळी कोणताही उमेदवार एका प्रभागातून जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र सादर करू शकेल आणि चारही नामनिर्देशन स्वातंत्र्यरित्या छानणी वेळी निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडून छानणी केली जातील. अर्थात केवळ एक नामनिर्देशन पत्र जरी वैध ठरले व इतर नामनिर्देशन पत्र अवैध ठरले तरी उमेदवाराच्या उमेदवारीस बाधा येत नाही. मात्र उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या मुदतीत एक जरी नामनिर्देशनपत्र मागे घेतले तरीही त्याने सर्व उमेदवारी मागे घेतली असा त्याचा अर्थ होईल असे स्पष्ट असतांना पालवनच्या त्या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे भाजपाच्या मदतीला
रोज एकमेकांच्या विरोधात राजकीय भाष्य करणारे, टिका, टिप्पणी करत राहणारे सर्व विरोधक पालवनच्या ग्रामपंचायत निवडणूकीत एकत्र आले आहेत. पालवनच्या ग्रा.पं.निवडणूकीत दोन सदस्यांनी इनकॅमेरा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंच्या मदतीला आले. परंतू ही मदत नियमबाह्यरित्या असल्याने प्रशासनाला ही काही करता आले नाही असेच दिसून येत आहे. 
No comments