Breaking News

आम्ही धनंजय मुंडेंच्या पाठीशी - ॲड पुरुषोत्तम खेडेकर चिखलीबारा जानेवारी हा दिवस आमच्यासाठी इतर कोणत्याही सण वा महोत्सव यापेक्षाही जास्त महत्वाचा असतो. कारण या दिवशी आम्ही जिजाऊ जन्मोत्सव सोहळा, जिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेड राजा परिसरात साजरा करत असतो. गेल्या काही वर्षांपासून बारा जानेवारी या दिवशी देशात वा राज्यात काही अनपेक्षीत घटना घडत आहेत. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठ न्यायमूर्तींनी बारा जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालय व भारतीय न्यायव्यवस्था बाबतीत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते. यावर्षी १२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ऑनलाइन सुरू होता. गेल्या पन्नास दिवसांपासून दिल्ली राजधानी शेतकरी आंदोलकांनी घेरली आहे . केंद्र सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये लागू केलेले तिन्ही कायदे रद्द करावेत हीच शेतकरी संघटनांची एकमेव महत्त्वाची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना या तीनही कायद्यास तात्पुरती स्थगिती बारा जानेवारी रोजीच दिली आहे. ही थोडी दिलासादायक भासणारी बातमी दुपारी समजली आणि रात्री उशिरा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वैवाहिक जीवनात कुरबुरी सुरू झाल्या आहेत अशा स्वरुपाची चर्चा ऐकायला मिळाली. याच वेळी धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुकवर या आरोपांना सविस्तर उत्तर दिलेले असल्याचे सोशल मिडीयामधुन माहित झाले.  त्यांचे स्पष्टीकरण, त्यातील स्पष्टता, सहजता व जबाबदारी समजून वागणूक हे सर्व ऐकून मला धनंजय मुंडे यांच्या बद्दल आदर निर्माण झाला आहे. त्यांनी दिलेल्या जाहीर स्पष्टीकरणा बद्दल मी धनंजय मुंडे यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आम्ही धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सामाजिक कार्यकर्ते या नात्याने खंबीरपणे उभे राहणार असल्याचे जाहीर करतो.

या निमित्ताने येथे हे स्पष्ट करतो की मी व धनंजय मुंडे एकमेकांना नावा पलीकडे ओळखत नाही. आम्ही दोघे कोणत्याही प्रकारचा सामुहिक उपक्रम चालवत नाही. आम्ही नातेवाईक नाहीत . एवढेच नव्हे तर आम्ही दोघेही बहुजन असलो तरी एका जातीचे सुद्धा नाहीत. या पाठींब्याबद्दल मला वा मराठा सेवा संघाला धनंजय मुंडे यांचे कडून काही फायदा झालेला नाही. मी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी स्वेच्छेने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. एवढेच नाही तर ही माहिती मला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपण्यापूर्वी मिळाली असती तर मी तेथूनच जाहीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे असल्याचे जाहीर केले असते. मी सामाजिक चळवळीत काम करतो. तेथे अशा अनेक चर्चा कानावर पडत असतात. यातील सत्य साधारणपणे बाहेर येत नाही. परंतू यातून अनेकांचे जीवन वा संसार उद्धवस्त झाले आहेत हे नक्की. मराठा सेवा संघ महिलांना सर्वोच्च स्थानी मानतो, महिलांचा सर्वोच्च मानसन्मान करतो. याचमुळे आम्ही आमच्या प्रेरणास्थानी जिजाऊ हे एक स्त्रिरुप स्वीकारले आहे. या पृष्ठभुमिवर आम्ही धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे आहोत याचे कदाचित अनेक महिला उध्दारकांना नवल वाटू शकते. ते आमच्या विरोधात कुरबुरी सुरू करू शकतात. पण अशा अनेक मिठ्ठूंची आम्हाला पर्वा नाही हे लक्षात घेऊन मी याबाबत सविस्तर निवेदन मांडत आहे..

धनंजय मुंडे , करुणा शर्मा मुंडे,  रेणू शर्मा  यांचेबाबत काही वर्तमानपत्रे व सोशल मिडिया मधून लोकांपर्यंत खालील माहिती आलेली आहे.

१. धनंजय मुंडे व शर्मा कुटुंबातील करुणा शर्मा, रेणू शर्मा व ब्रिजेश शर्मा साधारण सन १९९७-९८  दरम्यान एकमेकांना भेटले होते. शर्मा कुटुंब इंदौर मध्य प्रदेश येथील आहे. त्यांची आपसात भेट कशी झाली वा कोणी घडवून आणली याबाबत स्पष्टता नाही.

२. यावेळी धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचे प्रेमसंबंध सुरू होते. याची माहिती करुणा शर्मा यांचे बंधू ब्रिजेश व लहान बहिण रेणू यांना होती. ही माहिती रेणू शर्मा यांनी एका पोस्टमध्ये दिली आहे. त्यावेळी रेणू शर्माचे वय सतरा वर्षे होते असे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणले आहे.

३. धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचे प्रेमसंबंध वाढत गेले. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी स्वत: पुढाकार घेऊन ही सर्व माहिती प्रथम आपल्या विवाहित पत्नीला सांगितली होती असे दिसते. पत्नीचा होकार मिळताच बहुधा धनंजय मुंडे यांनी ही माहिती कुटुंबातील सदस्यांना व नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी मंडळी यांना सांगितली होती. धनंजय मुंडे यांनी आपल्या बायकोवर दबाव आणला असावा असे म्हणता येईल. परंतू त्यांच्या बायकोने आजतागायत तशी जाहीर तक्रार केली नाही. यात १९९७ ते २००३ असे पाच सहा वर्षे निघून गेले. दरम्यान धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचे प्रेमसंबंध कदाचित शारिरीक संबंधात रुपांतरीत झाले असावेत. यातून मध्यममार्ग स्विकारून धनंजय मुंडे यांच्या पत्नीसह सर्व कुटुंबीय व नातेवाईक मित्रमंडळी- सहकारी यांनी धनंजय मुंडे यांच्या लिव्ह इन रिलेशनशिप ला मान्यता दिली असावी. यानंतर धनंजय मुंडे व करुणा शर्मा सन २००३ पासून एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले होते. ही बाब धनंजय मुंडे यांच्या परळी वैजनाथ मतदार संघातील सर्वांना  माहित आहे. तसेच त्यावेळी धनंजय मुंडे यांचे वडिल पंडीत अण्णा, काका गोपीनाथ मुंडे जीवंत होते. करुणा शर्मा यांचे सोबत सर्व मुंडे कुटुंब जूळलेले होते. खुद्द करुणा शर्मा यांनी त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याबाबत सोशल मिडीयावर कबुली दिलेली आहे. त्या, त्यांची दोन अपत्ये व  धनंजय मुंडे यांच्या पत्नी, मुले-मुली एकत्र राहिले असल्याबाबत सुद्धा विवरण आलेले आहे. स्थानिक कौटुंबिक व राजकीय संबंध ताणले गेले असतांनाही कधीच कोणीही याबाबत बोलले नव्हते. सर्व पत्रकारांना ही माहिती होती. यात कोणालाही काही वावगे वाटले नव्हते व आजही वाटत नाही. 


      

४. धनंजय मुंडे व रेणू शर्मा यांच्या पोस्ट व निवेदनात म्हटले आहे की सन २००३ मध्यें धनंजय मुंडे व करूणा शर्मा यांनी एकमेकांसोबत विधिवत विवाह न करता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचे ठरविले होते. त्याप्रमाणे ते दोघे नवरा-बायको सारखे सोबत विवाह न करता सन २००३ पासून राहू लागले. मिळालेल्या अर्धवट माहीतीवरून असे लक्षात येते की यावेळी रेणू शर्मा व ब्रिजेश शर्मा मोठी बहीण करुणा शर्मा सोबत एका घरात राहत होते. त्यांचा सर्व खर्च धनंजय मुंडे करत होते. तसेच धनंजय मुंडे यांच्या पत्नीसोबत सर्व कुटुंबीय भेटत होते. अशा वेळी धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असतील ही शक्यता कमी आहे आणि ज्याअर्थी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा सोबतच्या संबंधांचा अधिकृत व जाहिर स्वीकार केलेला आहे, त्याच न्यायाने धनंजय मुंडे यांचा बेधडक स्वभाव लक्षात घेता त्यांचे जर रेणू शर्मा सोबत शारीरिक संबंध असते, तर तेही त्यांनी कबुल केले असते.

५. सन २००६ मध्ये करूणा शर्मा यांचे पहिले बाळंतपण झाले होते असे रेणू शर्मासह सर्वच म्हणतात. या निमित्ताने धनंजय मुंडे नियमित करुणा शर्मा यांना व बालकास भेटायला जात होते. यावेळी रेणू शर्मा तेथेच असत. २००६ मध्ये रेणू शर्मा २६+ वर्षें वयाच्या असाव्यात. त्यांना चित्रपट माध्यमातून करिअर करायचे होते असे त्यांच्या पोस्टमध्ये दिलेले आहे. करुणा शर्मा बाळंतीण असल्याने कदाचित धनंजय मुंडे यांच्या सोबत रेणू शर्मा वेळ घालवत असतील. अथवा सिनेमा क्षेत्रातील लोकांना भेटायला दोघे सोबत बाहेर पडले असतील. या काळात दोघेही एकमेकांच्या जास्त संपर्कात आले असतीलही. रेणू शर्मा यांनी मुंडे यांचेवर केलेले आरोप गंभीर आहेत. तरीपण २००६ ते २०१९ असे सलग बारा तेरा वर्षे शारीरिक संबंध जबरदस्तीने कधीच होत नाहीत हे स्फटिकासम स्पष्ट आहे. समजा एका परिस्थितीमध्ये रेणू शर्मा यांनी म्हटल्याप्रमाणे जर मुंडे यांचे त्यांच्यासोबत त्या पद्धतीचे संबंध असतील आणि 13 वर्षे ते संबंध विनातक्रार असतील तर अलीकडे न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सहमतीने आलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाहीत, हे पण समजून घ्यावे लागेल.‌ 

६. या काळात धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. लिव्ह इन रिलेशनशिप नियम व अटी नुसार धनंजय मुंडे यांनी मुलांचे केवळ पालकत्वच नाही तर पितृत्व मान्य केले. त्यांच्या नावापुढे बाप म्हणून आपले नाव लावले. त्यांना वेगळे घर घेऊन दिले. शिक्षण व दैनंदिन खर्चासाठी पैसे दिले असतील. करुणा शर्मा यांनी आपले सोशल मीडिया व इतर खात्यात आपली नोंद धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणून केली. यावरून धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना काही कमी पडू दिले नाही हे लक्षात येते. रेणू शर्मा यांच्या अपेक्षा कदाचित धनंजय मुंडे पूर्ण करू शकले नसावेत. अशावेळी सामान्यपणे अशा प्रकारच्या प्रकरणात काही महिला आपल्या स्त्रित्वाचा गैरवापर करतात हे आपण बघत असतो.‌ त्यासाठी  फसवणूकीतून बलात्कार हे हत्यार वापरले जाते. रेणू शर्मा यांनी हेच हत्यार उपसले आहे असे वाटते. हीच कुरबुर वाढत जाऊन पुढे २०१९ मध्ये शर्मा बहिणभावंडांना धनंजय मुंडे यांची उपयोगिता संपल्याचे जाणवले असेल. 

७. या वा काही इतर घडामोडींमुळे धनंजय व करुणा यांच्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये वादविवाद निर्माण झाले असावेत. दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले होते असे लक्षात येते. त्यामुळे सहजपणे आपल्या हातातून सावज सुटू नये या हेतूने शर्मा कुटुंबियांनी धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले असावे. अथवा वेगळे होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोबदला मागितला असावा .

८. हा जाच सहन होत नसल्याने  सुमारे एक वर्षापूर्वी धनंजय मुंडे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. त्यामुळे या प्रकरणात मुंडे यांनी काही लपवालपव केली असे अजिबात दिसत नाही. त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिप मधुन वेगळे होण्यासाठी तडजोड ठरलेली नसल्याने आणि अशा तडजोडीतुन केवळ करुणा यांनाच दिलासा भेटण्याची शक्यता असल्याने रेणू शर्मा यांनी आपले स्त्रित्व चुकीच्या पद्धतीने पणाला लावले असावे. भारतीय परंपरेत अप्सरा तंत्र सर्वांना परिचित आहे. अलीकडच्या काळात या बाबी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत असे लक्षात येते. 

९. आता धनंजय मुंडे व शर्मा कुटुंब वाद केवळ जगजाहीर झाले नाहीत तर सार्वजनिक झाले आहेत असे लक्षात येते. कोर्टात काय निर्णय होईल तो होईल. पण दुर्दैवाने काही राजकीय नेते, पत्रकार, महिला चळवळी इत्यादी काहींनी धनंजय मुंडे यांना एकतर्फी गुन्हेगार ठरविले आहे. ते असंवैधानिक, असंवेदनशील व अमानवीय आहे असे मला वाटते आहे. धनंजय मुंडे यांचे समर्थन केले तर कौटुंबिक व सामाजिक व्यवस्था संपेल असे त्यांचे म्हणणे आहे. पण काळाच्या ओघात सामाजिक व कौटुंबिक व्यवस्था मागील हजारो वर्षांपासून बदलत आहे, भविष्यात सुद्धा बदलत राहील, खरे म्हणजे बदल हा निसर्गाचा अविभाज्य नियम आहे. तसेच अशा बाबी कमी वा अपवादात्मक असतात. यात धनंजय मुंडे यांनी अशा विवाहबाह्य संबंधांना लपवून ठेवले नाही हे लक्षात घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

१०. धनंजय मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाबाबत कुटुंब व विशेषतः बायकोपासून हे संबंध लपवून ठेवलेले नव्हते व नाहीत. ही बाब उमदेपणाची किंवा अलंकारिक अर्थाने घ्यावयाचे म्हटल्यास मर्दपणाची आहे, विवाहबाह्य नात्यांना नैतिक उंची व समाजमान्यता देणारी आहे. आज धनंजय मुंडे यांच्यावर चिखलफेक करणाऱ्या अनेकांनी प्रथम आपले चारित्र्य तपासावे. काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांना इतरांच्या घरांवर दगडफेक करता येत नाही. धनंजय मुंडे यांच्या बायकोने नवऱ्याला परवानगी दिली होती. याबाबत काही आक्षेप असू शकतात. तसेच करुणा शर्मा सोबत त्यांचे लिव्ह इन रिलेशनशीपमधील संबंध कायदेशीर आहेत. सबब हा कलम ४९७ अंतर्गत गुन्हा नाही. रेणू शर्मा सोबत तेरा वर्षे शारीरिक संबंध होते असे मानले तरीही हे संबंध परस्पर सहमतीने होते असे लक्षात येते. ते संबंध बलात्काराच्या व्याख्येत बसणार नाहीत. या पृष्ठभुमीवर आज राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, मिडिया, सहकारी, शासकीय, साहित्यिक, प्रशासकीय, कॉर्पोरेट, सामाजिक, चित्रपट, करमणूक वा कौटुंबिक असे एकही क्षेत्र शिल्लक नाही की जेथे विवाहबाह्य व अनैतिक संबंधातून महिलांच्या शोषणासह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वच ठिकाणी प्रतिष्ठीत वर्गातील अनेक कुटुंबातील पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे खानदानी महिलांना कोंडमारा सहन करावा लागतो. धनंजय मुंडे यांच्या कुटुंबात कदाचित काही घडले असेल. अर्थार्जन, राजकारण, सिनेमा, नाटक, सिरियल, मिडिया, शिक्षण, साहित्य मधील करीअर करायचे असेल तर महिलांची अडवणुक केली जाते हे एकीकडे खरे आहे. तर दुसरीकडे काही निवडक महिलांनी स्वेच्छेने हे क्षेत्र निवडले आहे. असे सर्व क्षेत्रे कमी-अधिक प्रमाणात अनैतिकतेचे बळी ठरलेले असतांनाच धनंजय मुंडे सारखा एक सामान्य युवक आपल्या विवाहबाह्य संबंधांना कायदेशीर, कौटुंबिक, सामाजिक पातळीवरील मान्यता मिळवतो हेच जास्त महत्वाचे आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांचे अभिनंदन केले पाहीजे.

११. मराठी सिनेमात राजकीय सहकारी नेते फक्त गोरगरीब महिलांचे शोषण करतात असे रंगविलेले असते. उत्तर प्रदेश मधील एन डी तिवारी नावाच्या एका माजी राज्यपालांनी एका शर्मा नावाच्या महीलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले होते. त्यातुन त्यांना एक मुलगा झाला होता. पण एन डी तिवारी यांनी पितृत्व व संबंध नाकारले होते.  नंतर सर्वोच्च न्यायालयाने डीएनए टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यात एन डी तिवारी व शर्मा बाईंचे संबंध सिध्द झाले होते. आजही राजकारणात सर्वच राजकीय पक्षात शेकडो एनडी तिवारी राजरोसपणे फिरत असतात. धनंजय मुंडे यांच्या वर चिखलफेक करणारे लोक अशा सर्वच एनडी तिवारींना मानपान, प्रतिष्ठा देताना आपण बघत असतो. अशी मंडळी लाभार्थी होऊन त्यांच्या पैशावर मौजमजा करतात. हेच अनेक लोक नैतिकतेचे मुद्दे आज पुढे आणत आहेत. अर्थात ते गैरलागू आहेत. पडद्याआड अनेक एनडी तिवारी -- धर्म क्षेत्रापासून ते न्यायिक क्षेत्रापर्यंत सन्मानपूर्वक वागत आहेत. त्या मानाने धनंजय मुंडे यांनी दाखवलेली हिंमत अतिशय अभिमानास्पद बाब आहे . शाब्बास...

१२. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा अनैतिक वा विवाहबाह्य संबंधात गुंतलेल्या बहुतांशी महिला शर्मा वा तत्सम नावे धारण करणाऱ्या विशिष्ट गटातीलच आढळतात. मागील दोन चार वर्षात एका अध्यात्मिक महाराजांबाबत झालेले प्रकरण असो वा एका बाहुबली राजकीय नेत्याबाबत झालेले प्रकरण असो, शर्मा हे नाव सामाईक असल्याचे दिसून येते. बरेचसे  बहुजन समाजातील गावरान रांगडे सत्ताधारी खेडवळ पुरूष अशा बायकांच्या हनी ट्रॅप मध्ये अडकतात. अलीकडे दलाल नावाचे एक अमेरिकन किंवा युरोपियन कल्चर सगळीकडे हैदोस घालत आहे. यात शर्मा व तत्सम समुहातील महिला मंडळी बहुसंख्येने आहेत. बहुतेक बहुजन डंगर पुरूष कळत नकळत अडकतात वा अडकवले जातात. त्यांच्या घरातील सामान्य बायकांच्या नजरेतून हे सुटत नाही. पण सांगताही येत नाही नि सोसताही येत नाही, अशी गत होते. धनंजय मुंडे यांनी शर्मा भगिनींना मानसन्मान मिळवून दिला आहे. आर्थिक बाजू बळकट राहील असे सहकार्य केले आहे. दोघांच्याही परस्पर सहमतीने लिव्ह इन रिलेशनशिप स्टेटस स्विकारुन मायबाप झालेले आहेत. विवाहित बायको व नातेवाईक, कुटुंब यांनाही विश्वासात घेतलेले आहे. कुटुंबात, समाजात मान्यता मिळाली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांनी कोणालाही फसवलेले नाही हे स्पष्ट होते.

१३. ही बाब धनंजय मुंडे भाजपाचे नेते असताना सुरू झाली होती वा प्रत्यक्षात फळास आली होती. सदर प्रकरण जवळपास तेवीस वर्षे जूने आहे. सर्व कुटुंबातील सदस्यांना माहीत आहे. बिड परिसरातील व परळी वैजनाथ मतदार संघातील घरोघरी माहीत आहे. म्हणजेच धनंजय मुंडे यांचे हे वैयक्तिक पण कायदेशीर विवाहबाह्य संबंध स्थानिक राजकारण सोडून बाहेर आहेत. याचाच अर्थ असा होतो की ही बाब आता कुणीतरी जाणिवपूर्वक उकरुन काढलेली आहे. राजकीय अंगाने हा सर्व प्रकार होतो आहे का या दिशेने सुद्धा विचार करणे आवश्यक आहे.

 १४. आम्ही महिलांचा सर्वोच्च आदर करणारे आहोत. पण समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य केवळ महिलांसाठी राखीव नाही हे पण लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासात वा पुराणात विरोधी गटातील पुरूषांना फसवण्यासाठी महिलांना वापरले जात असे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.


आज धनंजय मुंडे विरोधात एकवटलेल्या सर्वांनी सर्वप्रथम अप्सरा तंत्राद्वारे हनी ट्रॅप सारख्या व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांना दूर करण्यासाठी काम केले पाहिजे. तेवीस वर्षे जुनी बाब एवढ्या उशीरा कुणीतरी उकरुन काढली आणि आज याबाबत अनावश्यक चर्चा केली जात आहे. धनंजय मुंडे यांनी जे केलेले आहे ते कदाचित सामाजिक नैतिकतेत बसणार नाही. पण माझे हे मत आहे की धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा ह्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहून मोठे कौटुंबिक व सामाजिक शहाणपण दाखविले आहे.

१५. आणीबाणी नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे सरकार आले होते. मोरारजी देसाई प्रधानमंत्री होते तर अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. एका शासकीय कार्यक्रमात मोरारजी देसाई यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाबतीत एक " ब्रह्मचारी " असे विशेषण वापरले होते. तेथेच अटल बिहारी वाजपेयी यांनी ते जाहीरपणे नाकारले व मी अविवाहित आहे पण ब्रह्मचारी नाही असा खुलासा केला होता. हे नैतिक की अनैतिक? माझ्या मते ही बाब नैतिक उंची दर्शविणारा प्रामाणिकपणा आहे. धनंजय मुंडे यांनी हेच केले आहे. धनंजय मुंडे यांनी बदनामी, सामाजिक दडपण, राजकीय नुकसान, मिडियाचे दलाल आणि इतर कोंडी यांची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता प्रामाणिकपणा व नैतिकता या बाबींचे प्रदर्शन केले आहे. जे काही थोडेफार लोक आपणच नैतिकतेचे संरक्षक आहोत असे मानत असतील त्यांनी अवश्य त्यांच्या नैतिकतेचे संरक्षण करावे मात्र त्यांच्या सोयीच्या नैतिकतेची मापे कृपया सर्वांना लावू नये.


१६. धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचेमधील लिव्ह इन रिलेशनशिप संबंध संपविण्यासाठी त्यांनी आपापसात केलेल्या करारानुसार तडजोड ते करतील. मात्र तोपर्यंत रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या घरी राहणे बेकायदेशीर होते. त्यांनी तेथून निघून जाणे हीच नैतिकता होती. सन २००६ मध्ये धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा सोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता असा त्यांचा आरोप आहे. त्यावेळी रेणू शर्मा पंचवीस वर्षे वयाच्या होत्या. त्यांनी त्याचवेळी तक्रार दाखल करणे गरजेचे होते वा घर सोडून बाहेर पडणे योग्य झाले असते. रेणू शर्मा एक तरुणी आहेत, महिला आहेत, आरोप करत आहेत. यावरुनच त्या निरागस, निर्दोष आहेत असे मानता येणार नाही.‌ मागील दोन दिवसात रेणु शर्मा यांचेवर हनी ट्रॅप चे आरोप महाराष्ट्रातील इतर काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच इतरही काही हाय प्रोफाईल पुरुषांनी लावल्याचे दिसुन येते. त्यामूळे रेणू शर्मा यांच्या स्त्रीत्वाचा सन्मान करताना हे पण लक्षात घेणे गरजेचे आहे की व्यावसायिक पद्धतीने त्या हे सर्व करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस तपासातुन तसेच न्यायालयीन प्रक्रियेतुन ते पुढे येईलच.

१७. करुणा शर्मा व रेणू शर्मा यांना त्यांचे सर्वच कायदेशीर हक्क व अधिकार वापरण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे. साधारण तेवीस वर्षांच्या संबंधानंतर वाद सुरू करण्याचे काम या शर्मा कुटुंबियांनी केले आहे. धनंजय मुंडे त्यांच्या विरोधात उभे राहिले होते. धनंजय मुंडे यांनी कोणताही आक्रस्ताळेपणा न करता कोर्टासमोर बाजू मांडलेली आहे. यातुन मुंडे यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ही त्यांची नितीमत्ता स्पष्ट होते.

१८. आज समाजात प्रतिष्ठित व सेलिब्रिटी दर्जा बाळगणारे काही पुरुष एकापेक्षा जास्त महिलांसोबत संबंध प्रस्थापित करताना पहिल्या पत्नीला डिव्होर्स सारख्या कायदेशीर हत्याराने लीलया वेगळे करतात आणि त्या महीलांच्या उर्वरित आयुष्याची राखरांगोळी करतात. आमचा समाज अशा कायदेशीर प्रक्रियेने झालेल्या पहिल्या महिलेवरील अन्यायाला वा शोषणाला योग्य ठरवितो. खासदार हेमामालिनी व धर्मेंद्र हे एक उदाहरण आहे.  या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी त्यांची कायदेशीर पत्नी, लिव्ह इन रिलेशनमधील सहकारी व एकूण पाचही अपत्यांच्या पालनपोषणाची व कौटुंबिक स्वास्थ्य संतुलीत करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती कोणत्याही अर्थाने असमानतेची वा अन्यायाची नाही. अर्थात करुणा शर्मा या त्यांच्या लिव्ह इन रिलेशनमधील सहकारी व रेणू शर्मा महिलेचे स्वातंत्र्य त्यांनी मान्य केले पाहिजे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतू महिलांनी असे करताना गैर मार्गाने जाऊ नये हीच अपेक्षा व विनंती आहे.. 

पुरुषोत्तम खेडेकर, चिखली
मो. नं. ९४२२०४६९९७
No comments