Breaking News

माजलगाव तालुक्यातील ग्रामीण बस सेवा सुरू करा - आगारप्रमुखांकडे राष्ट्रवादीच्या राजू कुरेशी यांची मागणी


माजलगाव ः कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर बस सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला परंतू अद्याप ही ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याकरिता तात्काळ ग्रामीण भागात बस सेवा सुरू करावी, अशी मागणी आगार प्रमुख यांच्याकडे राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते राजु कुरेशी यांच्यासह शिष्टमंडळाने गुरूवारी केली. तसेच आमदार प्रकाश सोळंके यांनी आगारप्रमुखांना पत्र देवून बस सेवा सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे बस सेवा बंद करण्यात आली होती. तीन महिण्यानंतर लांब पल्याच्या बस सुरू करण्यात आल्या. मात्र ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत करण्यात आली नाही. त्यामुळे मागील अनेक महिण्यापासून खाजगी वाहतुकीचा नागरिकांना सहारा घेवून आर्थिक भुर्दंड उचलावा लागत होता. त्यातच शासनाने मागील महिनाभरापूर्वी इयत्ता 9 वी ते 12 वी शाळा सुरू करण्यात आल्या. आता दि.27 जानेवारी पासून इयत्ता 5 वी ते 8 वी शाळा सुरू होणार आहे.

 शाळेत येण्या-जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समोर दळण-वळणाचा मोठा प्रश्‍न आहे. त्याकरिता ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यात येणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते राजु कुरेशी यांच्यासह अशोक राऊत, शेख कलीम, मजहर पटेल, मोईन खाँन, संकेत खळगे, एजाज शेख, शेख ईमरान, अखिल कुरेशी, बाबासाहेब भदरगे, जालिंदर घनगांव, शेख अरबाज, ओंकार अकायदान, सिध्दीकी झहीर, सय्यद खिजर, अहेमद शेख, ऋषिकेश कसबे, ज्ञानेश्‍वर खेत्री, ज्ञानेश्‍वर मोगर आदींनी गुरूवार दि.21 रोजी माजलगाव परिवहन महामंडळाचे आगारप्रमुख आबासाहेब चव्हाण यांची भेट घेवून विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या मांडून बस सेवा सुरू करण्याची मागणी केली. यावर आगारप्रमुख चव्हाण यांनी दोन दिवसात बस सेवा सुरळीत करण्यासाठी पाउले उचलली जातील असे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळास आश्‍वासित केले.No comments