बीड जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा शुभारंभ : जिल्हा रुग्णालयात सीईओ अजित कुंभार यांच्या हस्ते उदघाटन
बीड : देशभरात आज कोविड लसीकरणाला सुरवात झाली असून बीड जिल्हा रुग्णालयात कोविड १९ साठीच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते शनिवारी सकाळी उदघाटन करण्यात आले.
यावेळी शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, आणि रूग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
-कोविड लसीकरण मोहमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जाणार असून कोविड- १९ लसीकरणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, जिल्हा रुग्णालय बीड, उप जिल्हा रुग्णालय परळी वै, उप जिल्हा रुग्णालय गेवराई, उप जिल्हा रुग्णालय केज, ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे ही या मोहिमेला सुरवात करण्यात आली.
या लसीकरण मोहिमेसाठी पोर्टलवर १४६०९ आरोग्य कर्मचारी यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. जिल्हयात पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी १७६४० डोसेस जिल्हास्तरावर प्राप्त झालेले आहेत. प्रत्येक सत्राच्या ठिकाणी प्रति दिन १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोसेस दिले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. लसीकरणा दरम्यान काही गुंतागुंत झाल्यास (A.E.F.I.) आवश्यक प्रशिक्षण व तयारी करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १०८ रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत.
No comments