Breaking News

महिला महाविद्यालयात जिजाऊ जन्मोत्सव व विवेकानंद जयंती उत्साहात साजरी


परळी वैजनाथ :  युवा दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयांमध्ये  राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. जे. परळीकर  यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक  प्रमोद पत्की यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ.पी.व्ही.गुट्टे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. इतर उपस्थितांनीही या दोन्ही महान् विभूतींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर व्यक्तीमत्त्वाला आकार देताना स्वतः उत्तुंग पराक्रम गाजवणाऱ्या, राज्यकारभार कसा चालवावा याचं प्रात्यक्षिक स्वरूपांत शिक्षण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची थोरवी याप्रसंगी गायिली गेली. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत | असा उद्घोष करून 'उठा जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत प्रयत्न करत रहा ' हा सन्देश तरुणांच्या मनात बिंबविणारे स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

     याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉ. विनोद जगतकर यांनी सूत्रसंचालन केले तर ग्रंथपाल  एस. आर.कोकाट यांनी आभार मानले.  या कार्यक्रमात श्री सुहास कण्व श्री नागभूषण फुलारी सौ. गायकवाड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इतर प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि विद्यार्थिनींचाही सहभाग लाभला.

No comments