Breaking News

'स्वाधार' योजनेसाठी आणखी ४० कोटी रुपये निधी वितरित: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ - धनंजय मुंडे


मुंबई  : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील देयके अदा करण्यासाठी आज आणखी ४० कोटी रुपये निधी मंजूर करून वितरित करण्यात आला असून, येत्या काही दिवसातच लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यांवर ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

दहावी पुढील उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक व उदरनिर्वाह खर्च भागविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती देण्यात येते. ऑगस्ट २०२० मध्ये या योजनेअंतर्गत प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ना. धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रयत्नाने ३५ कोटी रुपये निधी वित्त विभागाकडून मंजूर करून घेत वितरित केला होता. 

राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक योजनांना कात्री लागली असून त्यांच्या एकूण वार्षिक लक्ष्य रकमेवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. परंतु या परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना व त्यांच्या हक्काच्या निधीला ब्रेक लागू नये या भावनेतून ना. मुंडे सातत्याने पाठपुरावा करत होते. वित्त विभागाने ४० कोटी रुपयांची मागणी मंजूर करून हा निधी वर्ग केल्यानंतर ना. मुंडे यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. 

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात या योजनेचे एकूण उद्दिष्ट १०० कोटी रुपये इतके असून, ना. धनंजय मुंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आर्थिक निर्बंध बाजूला ठेवत आतापर्यंत सदर योजनेची ७५% उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे. 

काही दिवसांपूर्वीच या योजनेची व्याप्ती धनंजय मुंडे यांनी मोठी शहरे व जिल्ह्याची ठिकाणे यांपासून विस्तार करत तालुका स्तरापर्यंत वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानंतर बाकी असलेली देयके देण्यासाठी आणखी ४० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून दिल्याने कोरोनाच्या या काळात विद्यार्थ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसात अनेक विद्यार्थी संघटनांनी मागणी केली होती; ना. धनंजय मुंडे यांच्या 'मागाल ते पुरवू' या निर्णय क्षमतेमुळे आता या सर्व संघटनांनी ना. मुंडेंचे आभार मानले आहेत.

No comments