Breaking News

जवाहर विद्यालयात महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा


माजलगाव :
केसापुरी वसाहत येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका  माधुरी कुलकर्णी ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक शुभांगी कुलकर्णी,जमिला शेख, मुख्याध्यापक अभिमन्यु इबिते, पर्यवेक्षक किशोर मोताळे, मोरेश्वर मसलेकर, गौतम पोटभरे, संजीवनी चांदमारे, गायत्री खोडवे, सुनिता भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

         सावित्रीमाईंच्या प्रतिमापूजनानंतर धनंजय जाडे यांनी 'रंजल्या गांजल्याची सावित्री आई होती ' हे गीत सादर केले. यावेळी महिला शिक्षण दिनानिमित्त विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा ग्रंथ आणि  गुलाबपुष्प देऊन विद्यालयातर्फे गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक जमिला शेख यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक शुभांगी कुलकर्णी म्हणाल्या की आजची स्त्री सावित्रीबाई यांच्या कार्यामुळेच यश मिळवत आहे. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वलिखीत एकांकीका सादर केली.

        

मुख्याध्यापक अभिमन्यु इबिते यांनी मार्गदर्शनात सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेऊन प्रत्येकाने कार्य करावे. सर्व मुली शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि टिकून राहतील यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावेत. अध्यक्षीय समारोपात माधुरी कुलकर्णी यांनी स्त्री शिक्षणाविषयी सावित्रीबाई यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चैतन्या वंजारे हिने केले तर आभार गायत्री खोडवे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments