Breaking News

पत्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकपत्रकारितेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा- लक्ष्मण वाकडे

अ. भा.मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मूकनायक दिन साजरा

परळी :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक' , 'बहिष्कृत भारत', 'समता'  'जनता' , 'प्रबुद्ध भारत' अशी पाच वृत्तपत्रे  सुरू केली होती. वृत्तपत्राच्या माध्यमातून शोषित, पीडित, अस्पृश्यांच्या व्यथा आपल्या लेखणीद्वारे मांडल्या व तमाम  बहुजन समाजाला जागृत केले. अज्ञान, अंधकारात बुडालेल्या समाजाला आपल्या लेखणीच्या माध्यमातून जागृत केले. पत्रकारांनी डॉ.बाबासाहेबांच्या लेखणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्भीडपणे पत्रकारिता करावी असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे सर यांनी केले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या परळी शाखेच्या वतीने मूकनायक दिन' आयोजित  करण्यात आला होता. 'मूकनायक दिन' कार्यक्रम मराठवाडा साथी पीसीएन न्यूज कार्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दि.31 जानेवारी 2021 रोजी संपन्न झाला.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मराठवाडा साथी चे मुख्य संपादक तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी, जेष्ठ विधीज्ञ दत्ता महाराज आंधळे, संपादक सतीश बियाणी,जेष्ठ पत्रकार विश्वास महाराज पांडे, पीसीएन न्युज चे संपादक मोहन व्हावळे, संपादक बालकिशन सोनी, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, ओमप्रकाश बुरांडे, करन जाजू, सतिष लोया, नीरज लोया, आ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने, तालुका अध्यक्ष दत्ता काळे,शहराध्यक्ष जगदीश शिंदे, तालुका उपाध्यक्ष मिलिंद चोपडे, कार्याध्यक्ष आनंत कुलकर्णी, तालुका सचिव स्वानंद पाटील, नरसिंग आनलदास आदिंची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पुढे बोलताना ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे म्हणाले  की, वंचित, पीडित, दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. 

त्यांनी आपली लेखणी अन्याय-अत्याचाराच्या विरोधात चालवली. 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', 'समता', 'जनता', 'प्रबुद्ध भारत'  अशी पाच वृत्तपत्रे बाबासाहेबांनी सुरू केली होती. यातील 'मूकनायक' या पाक्षिकाचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रसिद्ध झाला. आज 'मूकनायक' या वृत्तपत्रास 101 वर्षे पूर्ण झाली असून कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी ही 'मूकनायक'ला आर्थिक साहाय्य केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने यांनी तर उपस्थितांचे आभार अ.भा मराठी पत्रकार परिषदेचे परळी शहराध्यक्ष जगदीश शिंदे यांनी मानले.


No comments