Breaking News

वैद्यनाथ साखर कारखान्याचा वजन काटा अचूक विशेष भरारी पथकाने केली अचानक पाहणी

परळी वैजनाथ : राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील ऊस वजन काट्याची शासनाच्या  वैधमापन खात्याच्या विशेष भरारी पथकाने तपासणी केली असता तपासणीत वैद्यनाथ कारखान्याचा वजन काटा अचूक असल्याचे दिसून आले. वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही तसा अहवाल वैधमापन खात्याच्या पथकामार्फत देण्यात आला असल्याची माहिती वैद्यनाथचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी दिली.

         यंदाचा गळीत हंगाम चालू असून साखर आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या विशेष भरारी पथकाने मंगळवार दिनांक १९ जानेवारी रोजी कारखान्यास अचानक भेट देवून वजन काट्याची तपासणी केली. सध्या शासनाच्या आदेशानुसार सर्वच कारखान्याची तपासणी केली जात असुन त्याचाच एक भाग म्हणून ही तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत वैद्यनाथ साखर कारखान्याचे वजन काटे हे अचूक आढळून आले असून तसा अहवाल पथकाने कारखान्यास दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी दिली आहे. 

      नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक पी. बी. मेने, लेखापरिक्षक श्रेणी-1 ए. बी. नागरगोजे, शेतकरी प्रतिनिधी लक्ष्मण भरत सोळुंके, माणिक रेऊ पवार , पोलीस प्रतिनिधी रामचंद्र केकान यांच्या विशेष पथकाने कारखान्यास भेट देऊन कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली. 

          भरारी पथक येण्यापुर्वी शेतक-यांची ऊसाने भरलेली वाहने वजन करून गव्हाणीकडे पाठवण्यात आली होती. त्याचवेळी भरारी पथकाने हीच वाहने परत बोलावून त्या-त्या काट्यावर फेर वजन तपासणी केली असता वजन अचूक आणि तंतोतंत आढळून आले. भरारी पथकाने समाधान व्यक्त करून तसा अहवाल कारखान्यास दिला. इतकेच नव्हे तर ऊस वजनासाठी वापरात असलेले वजन काट्यांची शासनाच्या वैधमापनशास्त्र विभागाकडून पडताळणी व मुद्रांकीत झाले असल्याचे प्रमाणपत्रासह पथकाच्या निदर्शनास आणून दिले. कारखान्याकडे स्वत:ची प्रमाणीत वजने यांची पथकाने बराच वेळ तपासणी केली असता तंतोतंत वजन दर्शविले. या भरारी पथकाने कारखान्याचे ऊस वजन काटे अचूक असल्याची खात्री करून घेतली. काट्यांच्या तपासणी वेळी कारखान्याचे चिफ केमिस्ट रमेश जायभाये, केनयार्ड सुपरवायझर वाल्मीक अघाव, केन अकौंटंट माणिक कराड यांच्यासह ऊस उत्पादक सभासद शेतकरी, तोडणी मजूर, वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


No comments