Breaking News

अंतर्मनातून समाजामध्ये विचारांचे अंकुर रुजवणाऱ्या दत्तात्रय काळे यांचा सार्थ सन्मान

 


रिपोर्टर ऑफ द इयर..!

    परळी तालुक्याच्या वृत्तपत्रीय तसेच पत्रकारिता क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी मागील वर्षभराच्या काळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न मांडणाऱ्या व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा येथील कराड हॉस्पिटलचे संचालक डॉ. बालासाहेब कराड व डॉ. शालिनीताई कराड यांच्यावतीने रिपोर्टर ऑफ द इयर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पाहायला गेलं तर 2020 हे साल सर्वांसाठी खडतर व कष्टप्रद होते. अशाही परिस्थितीत ज्या काही मोजक्या पत्रकारांनी कोरोणा काळातदेखील समाजहिताच्या व गरजेच्या असणाऱ्या सकारात्मक वार्तांकनास प्राधान्य दिले. त्यामध्ये येथील मराठवाडा साथी मध्ये कार्यरत असणारे वृत्तसंपादक दत्ता काळे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. याच अनुषंगाने त्यांच्या वर्षभरातील लोकहित साधणाऱ्या सर्वंकष समग्र लिखाणाचा विचार करत यावर्षीचा रिपोर्टर ऑफ द इयर हा पुरस्कार  विचारवंत, अवलिया, हाडाचे पत्रकार, उत्तम निवेदक,व ज्ञान कौशल्याच्या जोरावर ती विविध क्षेत्रात स्वच्छंद विहार करणारे व आपल्या लेखणी सामर्थ्याने समाजहिताचे नानाविध जटिल प्रश्न सोडवणारे धडाडीचे पत्रकार तथा मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक असणाऱ्या दत्तात्रय काळे यांना प्राप्त झाल्याने त्यांचा तो सार्थ सन्मान असल्याचे मनोमन वाटते...

   तस पहायला गेलं तर बीड जिल्हा म्हणजे निडर, अभ्यासू, जिज्ञासु व नाविन्याचा शोध घेणाऱ्या पत्रकारांची जणू खानच आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यातच सर्वाधिक वर्तमानपत्र व दैनिक चालवली जातात प्रकाशित होतात. आपसुकच यामुळे एकूणच येथील पत्रकारिता क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असून या क्षेत्रामध्ये येणाऱ्यांचा कल वाढलेला आहे. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या बहुतांश नवोदितांना  याठिकाणी व्यासपीठ देखील उपलब्ध होते. पत्रकारिता क्षेत्र एका मृगजळासारखे असून बाहेरून पाहणार्‍याला त्याची झळाळी व चकाकी जाणवल्याशिवाय राहत नाही. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आदीं बाबी वरती बीड जिल्ह्यातील पत्रकार अभ्यासपूर्ण भाष्य करत असतात व तेवढी समग्र प्रतिभा देखील येथील पत्रकारांमध्ये असल्याचे जाणकारामधून बोलले जाते.

     मराठवाड्यामध्ये नावाजलेल्या व परळीचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक मराठवाडा साथी मध्ये देखील अशीच प्रतिभावंत विचारांच्या पत्रकारांची फौज तैनात असून त्यातीलच एक म्हणजे अतिशय ग्रामीण भागातून येत आपल्या अभ्यासू वृत्ती च्या जोरावर बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाडा व महाराष्ट्र राज्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात मुक्त संचार करत आपल्या लेखणीच्या मध्यमातून अनेक जटिल प्रश्नांची उकल करणारे व समाजातील बारीक सारीक घडामोडींवर भाष्य करणारे प्रामाणिक निष्ठावान निडर जिज्ञासु आणि धडाडीचे पत्रकारितेतील आमचे मार्गदर्शक मित्र स्नेही एक स्वयंभू व्यक्तिमत्व असणारे तथा दैनिक मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक व 2021 या वर्षीच्या रिपोर्ट ऑफ द इयर या पुरस्काराचे मानकरी ठरलेले दत्तात्रय (भाऊ) काळे हे होय.

      परळी पंचक्रोशीत पत्रकारिते च्या क्षितिजावरती तेजोमय चमकणाऱ्या व आपल्या कार्यशैलीच्या जोरावर निडर बाणा जपनाऱ्या तसेच या क्षेत्रातील धडाडीचे नाव असलेल्या दत्तात्रय काळे यांच्या कडे पत्रकारितेतील जवळपास एका तपाचा अनुभव असून गेल्या अनेक वर्षांपासून ते आपली लेखणी समाजातील विवीध प्रश्नासाठी झिजवत आहेत.  पत्रकारितेतील ग्लॅमर, मिळणारा मानसन्मान, प्रसिद्धी आणि त्याला जोडून येणारा अहंभाव त्यामुळे अनेक जण हवेत असतात. परंतु काळे साहेब याला कायम अपवाद राहिले आहेत. पत्रकारिते सोबतच ते एक उत्तम निवेदक देखील असून पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये  मित्रांचा गोतावळा जमवला आहे. बीड जिल्ह्यात नव्हे तर सबंध मराठवाड्यामध्ये त्यांनी आपली जिज्ञासू वृत्ती नवीन काहीतरी शोधण्याचा व देण्याचा प्रयत्न व लेखणी सामर्थ्याच्या जोरावरती आपल्या कार्य व कर्तृत्वाने स्वतःची एक वेगळी अशी छबी निर्माण केली आहे.

    

   पत्रकारितेमध्ये वेगवेगळे तथा नवनवीन प्रयोग करण्याचा त्यांचा नेहमीच माणस असतो. त्यांचे विविध विषयावरील लेख, अग्रलेख, व्यक्तिविशेष, मुलाखती विशेष वार्तांकन व सर्वंकष लेखन अतिशय प्रभावी व वास्तवदर्शी असते. पत्रकारितेत येणाऱ्या नवीन पत्रकारांसह  अनेकांसाठी ते नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. पत्रकारिताच नाही तर विविध समाजमाध्यमातून व आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देखील समाजप्रबोधनपर लेखनही ते नेहमीच करत असतात. दत्तात्रय काळे यांचे अंतर्मनाचा कप्पा व विचारांची पहाट हे दोन ब्लॉग देखिल सर्वदुर व सर्वपरिचित आहेत. अशा या प्रामाणिक निष्ठावान निडर लेखणी बहाद्दर असणाऱ्या व आपल्या अंतर्मनातून विचारांचे मुल्य समाजामध्ये रुजवणाऱ्या दत्तात्रय काळे यांना परळी येथील कराड हॉस्पिटलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'रिपोर्टर ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन दर्पण दिनी विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आले आहे. 

    प्रतिवर्षी परळी पंचक्रोशी मध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून भरीव योगदान देणाऱ्या व समाजाच्या विविध प्रश्नावरती लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या धडाडीच्या तथा शोधपत्रकारांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. हा पुरस्कार येथील कराड हॉस्पिटल चे संचालक डॉ. बालासाहेब कराड व डॉ. शालिनीताई कराड यांच्या वतीने दर्पण दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येतो. समाजहिताच्या व चांगल्या लिखाणाचं कौतुक करण्याचं कार्य या पुरस्काराच्या माध्यमातून नेहमीच डॉ. कराड दंपत्याकडून केले जाते. दरवर्षी पत्रकारांच्या वर्षभरातील लेखनाचा समाजावरील पडणारा प्रभाव लक्षात घेत प्रभावी लेखन असणाऱ्या एका पत्रकाराची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. समितीने या पुरस्कारासाठी दत्तात्रय काळे यांची केलेली ही निवड व त्यांना दिलेला रिपोर्टर ऑफ द इयर हा पुरस्कार सार्थ असल्याचे मनोमन वाटते...

पत्रकार श्रीराम लांडगे

 परळी वैजनाथ


No comments