Breaking News

मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांनो मराठीचा सन्मान करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जायला तयार रहा : देवराव लुगडे महाराज

परळी वैजनाथ :  येथील राणी लक्ष्मीबाई मनोऱ्याजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाचा खातेधारक प्रामुख्याने ग्रामीण भागातील आहे. पण, अधिकारी मात्र परप्रांतीय आहेत. हे अधिकारी ग्रामीण नागरिकांना हिंदी व इंग्रजी भाषेत संवाद साधण्यासाठी जबरदस्ती करतात. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहेत. ह्या अधिकाऱ्यांना केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार व १९६४च्या महाराष्ट्र राजभाषा कायद्यातील तरतुदीनुसार मराठी येणे बंधनकारक आहे. जर यापुढे मराठीचा सन्मान केला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.

याच कायद्यानुसार ८ जानेवारी रोजी मुंबईतील सिवूड शाखेच्या शाखा अधिकारी यांच्यावर स्टेट बँकेने कारवाई करत त्यांची बदली करून त्यांना त्वरित मराठी शिकण्याचे आदेश दिलेले आहेत. याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर परळीतील एस बी आय बँक अधिकाऱ्यांना मराठीचा सन्मान करावाच लागेल अशी आग्रही भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

मायबोली मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी तसेच शासकीय कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी सरकार अधिक प्रयत्न करत आहे. राज्यात शासकीय कामकाज १०० टक्के मराठी करणे आवश्यक असून, त्यासाठी १९६४च्या महाराष्ट्र राजभाषा कायद्यात काही स्पष्ट तरतुदी आहेत. शिवाय त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील शासकीय कार्यालये, मंडळे, शासकीय उपक्रमांनीसुद्धा मराठीचा वापर करणे अनिवार्य आहे. मायबोली मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी राज्यात १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो.

मराठीचा वापर शासकीय कामकाजात व्हायलाच हवा. देशाच्या विविध राज्यात तेथील मायबोली मातृभाषेचा वापर शासकीय कामकाजासाठी केला जातो. महाराष्ट्र राजभाषा कायद्यानुसार काही अपवाद वगळता सर्वच सरकारी कामकाज मराठी होणे आवश्यक आहे. त्रिभाषा सूत्रानुसार केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महाराष्ट्रातील कार्यालयाच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर होतो की नाही याचा त्या पंधरवड्यात आढावा घेतला जातो. मात्र येथील एस बी आय बँकेत त्याच्या उलटे घडत आहे. जर बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मराठी द्वेष व अरेरावी दहा दिवसांत थांबली नाही तर संभाजी ब्रिगेड स्टाईलने व्यापक जनआंदोलन उभारले असा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.


No comments