Breaking News

कोरोना काळातील महिला योध्दांचे कार्य उल्लेखनीय- तृप्तीताई देसाई


गेवराईत बी.एम.प्रतिष्ठाणकडून महिला योध्दांचा 'माँ जिजाऊ रत्न' पुरस्कार देऊन गौरव

गेवराई : कोरोना महामारी हा काळ अत्यंत कठीण होता. यामध्ये आपला जीव सुध्दा जाण्याची भिती असताना देखील या कठीण काळात न डगमगता कोरोना योध्दांनी आपल्या जीवाची बाजी लावत कर्तव्य पार पाडले. यामुळेच आपण आज सुरक्षित राहिलो. या काळात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने उल्लेखनीय कार्य केले असून या कर्तत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक आहे. तरी त्यांच्या या कार्याची दखल सभापती सविताताई मस्के व बी.एम.प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी घेतली. त्यांच्या कार्याचा आज सन्मान होतोय, हि त्यांच्या कार्याची पावती आहे. या कौतुकास्पद सन्मानामुळे महिला योध्दांचे निश्चितच मनोबल वाढेल असे प्रतिपादन भुमाता ब्रिगेड तथा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांनी गेवराई येथे आयोजित कोरोना योध्दा सन्मान सोहळा कार्यक्रमात केले.


तसेच महिलांचा सन्मान वाढविणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल तृप्तीताई देसाई यांनी सभापती सविताताई मस्के व बाळासाहेब मस्के यांचे विशेष अभिनंदन केले. या सन्मान सोहळ्यात पोलीस, आरोग्य, सामाजिक आदी क्षेत्रातील 100 हून अधिक महिलांचा माँ जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानचिन्हासह गौरव करण्यात आला.

     कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक भान ठेवून गेवराई तालुक्यातील पोलिस, आरोग्य तसेच इतर काही क्षेत्रातील महिलांचा राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने बुधवार दि.13 रोजी येथील सिंधी भवन या ठिकाणी कोरोना योध्दा सन्मान सोहळ्याचे आयोजन बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई मस्के व बी.एम.प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी केले होते. यावेळी भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईं, जिल्हा शल्यचिकित्सक सुर्यकांत गिते, छावा संघटनेचे गंगाधर काळकुटे, सभापती सविताताई मस्के, महिला व बालविकास सभापती यशोदाबाई जाधव, गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एम.व्ही. चिंचोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, राष्ट्रवादी महिला बीड जिल्हा अध्यक्षा संगिता तुपसागर, राष्ट्रवादी महिला युवती बीड जिल्हा अध्यक्ष विद्याताई जाधव, राष्ट्रवादी गेवराई महिला आघाडी अध्यक्षा मुक्ता आर्दड, राष्ट्रवादी महिला युवती तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्य मोनिकाताई खरात आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

    कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. यानंतर महिला डॉक्टर, नर्स, परिचारिका, महिला पोलिस कर्मचारी, बचतगट, आशा, अंगणवाडी सेविका आदी 100 हून अधिक कर्तत्ववान कोरोना योध्दा महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना बी.एम.प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के म्हणाले की, कोरोना या जागतिक महामारी विषाणूने थैमान घातले असताना अशा परिस्थितीमध्ये देखील पोलिस, आरोग्य, सामाजिक महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक भान ठेवून दिवसरात्र कर्तव्य बजावून जनतेचे रक्षण केले.

 त्यामुळे या कर्तत्ववान महिला कोरोना योद्धे असून त्यांच्या या कार्याचा गौरव, त्यांना यापुढे काम करताना अधिक ऊर्जा मिळावी म्हणून या महिलांचा राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने सन्मान सोहळा करुन गौरव केला आहे. यापुढे देखील महिलांसाठी कार्य करण्यासाठी तत्पर राहील असे आश्वासन त्यांनी दिले. बी.एम.प्रतिष्ठानच्या सौजन्याने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तर आम्ही करत असलेल्या कामाचे अशाप्रकारे कौतुक होत असल्याने यामुळे आम्हाला काम करण्यास अधिक ऊर्जा मिळेल असे सत्कारमुर्ती आशा सेविका मिरा मिसाळ यांनी सांगत कार्यक्रमाच्या संयोजकांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार सुनील मुंडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत घेऊन करण्यात आली.

No comments