Breaking News

वर्गणी ऐवजी झाड मागणारा भारतातील पहिला जिजाऊ जन्मोत्सव : सुसेन महाराज नाईकवाडे यांचे गौरवोद्गार


वृक्ष लागवडीने जिजाऊ जन्मोत्सवाचा शानदार शुभारंभ

वडवणी : वर्गणी ऐवजी केवळ झाडाची मागणी करणारा आणि गावोगावी वृक्षारोपण करणारा वडवणी तालुक्यात राबविण्यात येत असलेला जिजाऊ जन्मोत्सव हा भारतातील पहिला जन्मोत्सव असल्याचे गौरवोद्गार ख्यातनाम शिवव्याख्याते, शिवचरित्रकार सुसेन महाराज नाईकवाडे यांनी काढले. ते वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील जिजाऊ जन्मोत्सवाच्या शानदार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हाभरातून अनेक मान्यवर उपस्थित झाले होते.

   महाराष्ट्रात झी टॉकीजवर मन मंदिरा गजर भक्तिचा या कार्यक्रमांतर्गत कीर्तनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले ख्यातनाम शिवचरित्रकार  सुसेन महाराज नाईकवाडे हे वडवणी तालुक्यातील हिवरगव्हाण येथील रहिवासी आहेत. आपण या तालुक्याचे भूमिपुत्र असल्यामुळे या तालुक्यात जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव हा एक  आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यांनी त्यांच्या मित्र परिवाराला सोबत घेऊन एक आगळा-वेगळा जन्मोत्सव दिनांक ८ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय घेतला. या जन्मोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची वर्गणी न मागण्याचा निर्णय घेऊन "वर्गणी नको, झाड द्या" असा उपक्रम त्यांनी राबविण्यात येत आहे. त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत अनेक मान्यवरांनी त्यांना झाडांची भेट दिली आहे. हे झाडे लागवड करून जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे जिजाऊ जन्मोत्सवाचा शानदार शुभारंभ करण्यात आला.

 यावेळी ख्यातनाम व्याख्याते प्रवीण इंगळे यांचे मार्गदर्शन झाले. तर सुसेन महाराज नाईकवाडे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिजाऊ जन्मोत्सव गावोगावी साजरा व्हावा ही माझी भावना आज  पूर्ण होत आहे. कोणताही खर्च न करता, कोणताही सत्कार न करता, वाद्य अथवा डीजे न लावता  वर्गणी न मागता  झाडे मागणारा  आणि गावोगावी झाडे लावुन साजरा होणारा हा जन्मोत्सव भारतातील पहिला जन्मोत्सव आहे. हा जन्मोत्सव भावी काळात प्रेरणादायी ठरेल असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले. यावेळी लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष एडवोकेट राज पाटील यांनी या उपक्रमाला ११० झाडांची भेट दिली तर डॉ. विजयकुमार निपटे यांनीही ४० झाडांची भेट दिली. यावेळी लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष राज पाटील, एडवोकेट कुंदन काळे, बजरंग साबळे, अमोल आंधळे, दत्ता वाकसे, नवनाथ गिलबिले, अशोक निपटे, पसायदान सेवा प्रकल्पाचे संचालक  दराडे, जगदीश फरताडे कुलकर्णी, अशोक महाराज अजबे, पत्रकार रामेश्वर गोंडे, अजय जाधव, रवी लांडे,  सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच पत्रकार अशोक निपटे यांनी केले. सुत्रसंचलन ओमप्रकाश साबळे यांनी तर आभार हनुमंत म्हात्रे यांनी मानले.

 

 लाखोंनी पाहीला लाईव्ह कार्यक्रम 

पिंपरखेड येथे जिजाऊ जन्मोत्सवाचा झालेला शानदार शुभारंभाचा कार्यक्रम विविध न्युज चॅनलवरुन लाईव्ह होता. महाराष्ट्रातील लाखो लोकांनी हा  लाईव्ह कार्यक्रम पाहिला. 

  सत्कार ऐवजी जिम्मेदारी

 पिंपरखेड येथे झालेल्या जन्मोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमात कोणत्याही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नाही. सत्कार ऐवजी  एक झाड उपस्थित मान्यवराला देऊन ते झाड  मान्यवरांनी आपल्या दारात लावून वाढवायची जिम्मेदारी देण्याचा अभिनव उपक्रम या कार्यक्रमात सुरू करण्यात आला.

No comments