Breaking News

… शेतकऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा


दिल्ली :  सरकारसोबत आमची पुन्हा एकदा ४ जानेवारीला चर्चा होणार आहे. आमच्या मागण्यांबाबत जर ठोस तोडगा निघाला नाही तर मात्र आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील असं म्हणत शेतकऱ्यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. मागील ३६ दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. चर्चेच्या आत्तापर्यंतच्या फेऱ्यांमधून ठोस असा काही तोडगा निघू शकलेला नाही. कृषी कायदे आमच्या हिताचे नाहीत त्यामुळे ते रद्द करावेत ही आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

४ जानेवारीला म्हणजेच येत्या सोमवारी शेतकरी संघटनांची आणि सरकारची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. सिंघू बॉर्डवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. कडाक्याच्या थंडीत हे आंदोलन होतं आहे. सरकारने या शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरु असतानाही शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. आता शेतकरी संघटनांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर ४ जानेवारीची चर्चाही निष्फळ ठरली तर मात्र आम्हाला कठोर पावलं उचलावी लागलीत असं शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे.

४ जानेवारीला चर्चा निष्फळ ठरल्यास हरयाणातले सगळे मॉल्स, पेट्रोल पंप बंद केले जाणार आहेत असं शेतकरी नेते विकास यांनी स्पष्ट केले आहे. पंजाब आणि हरयाणामधले हजारो शेतकरी सध्या दिल्ली-हरयाणाच्या सिंघू बॉर्डवर आंदोलन करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र आता ४ जानेवारीला होणारी चर्चाही निष्फळ ठरली तर आंदोलन आणखी कठोर केलं जाईल असं आता शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

No comments