Breaking News

जिजाऊ जयंती सोहळ्यात महिलांना मिळाले मानाचे स्थान!


ग्रामस्थांच्या उपस्थितीत पौळ पिंपरीत संपन्न झाला दिमाखदार सोहळा 

परळी : तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथे जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि.१२ जानेवारी रोजी गावाच्या मुख्य भागात असलेल्या चौकातील राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्याचबरोबर सरपंच सौ.शामल माणिकराव पौळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या पताकेजे ध्वजारोहण व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

पिंपरीत झालेल्या जिजाऊ जयंती सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या प्रथम नागरीक सौ.शामल माणिकराव पौळ तर प्रमुख अतिथी म्हणून दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पौळ यांच्यासह गावातील अंगणवाडी सेविका व आशा सेविका उपस्थित होत्या. विशेष म्हणजे गावातील सर्व प्रमुख नेत्यांनी व्यासपीठासमोर बसण्याची भूमिका घेवून जिजाऊ जयंतीला विशेष अतिथी म्हणून गावातील महिलांना मानाचे स्थान दिले. बालव्याख्याती कु.वैष्णवी दत्तात्रय साबळे हिने आपल्या भारदस्त आवाजात राजमाता जिजाऊंचा इतिहास सर्वांच्या डोळ्यासमोर मांडतांना म्हटले की, जिजाऊ या अखंड विश्वातील महिलांसाठी अखंड उर्जेचा स्त्रोत आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. समानता, नितीमत्ता आणि राजशिष्टाचाराबरोबरच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची शिकवण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना दिली. तर दत्तात्रय काळे म्हणाले की, छत्रपतींचा इतिहास हा आपल्यासाठी प्रेरणादायी आणि उर्जादायी आहे. आजही समाजव्यवस्था सुरळीत चालत आहे ती केवळ आणि केवळ छत्रपतींच्या विचारधारेवरच. राजमाता जिजाऊंनी रयतेच्या सुखातच आपले सुख मानले व राज्यापेक्षा राज्यातील जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. आज स्त्रियांनी त्यांच्या आदर्श विचारांची पेरणी पुढील पिढ्यांमध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रांत पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करणाऱ्या स्त्रिया या केवळ राजमाता जिजाऊंच्या विचारांचीच देण असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, जेष्ठ नेते बबन अप्पा पौळ, सरपंच पती माणिकराव पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी बु. येथे जिजाऊ जयंतीच्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मण तात्या पौळ यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून गावात राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात येत आहे. आगामी वर्षभरात गावात जिजाऊंचे भव्य स्मारक उभे राहणार असल्याची माहीतीही त्यांनी दिली. कार्यक्रमास गावातील महिला, मुले, जेष्ठ नागरीक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचारवंत तथा शिवविचारांचे अभ्यासक लक्ष्मण वैराळ यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.दत्तात्रय मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ नेते बबनअप्पा पौळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. ग्रा.प.सदस्य दादा आवटे,रूस्तुम माने, दादासाहेब डीकले यूवा नेते बिबीशन जाधव, विष्णू काळे, राजाभाऊ कोल्हे, हनूमान पौळ, अजित पौळ,सिद्धेश्वर दळवी, राजश्री कुलकर्णी, बिबन शेख आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती.

No comments