Breaking News

प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला 'आम आदमी' जिंकला; ठिय्याच्या दणक्याने इमामपूर रस्त्याचे रखडलेले काम झाले सुरू !


आंदोलनाकडे 6 दिवस न फिरकलेले मुख्याधिकारी, नगराध्यक्ष स्वतः आंदोलन स्थळी उपस्थित राहिले

जिल्हाध्यक्ष अशोक येडेंच्या नेतृत्वाखाली छोट्याशा आप पक्षाने बीडकरांची मने जिंकली

बीड :  शहरातील इमामपूर रोड - बार्शी नाका येथील रस्त्याचे काम गेल्या १ वर्षांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी वारंवार निवेदने, चर्चा करूनही नगरपरिषद प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आम आदमी पक्षाने 6 दिवसांपासून येथे ठिय्या आंदोलन सुरु केले होते. दिवस रात्र ठिय्या मांडत आज देखील या आंदोलनाला येथील नागरिकांनी पाठिंबा देत नगर परिषदेच्या नकारात्मक धोरणाचा निषेध केल्याने नगरपरिषदेच्या प्रशासनाला जाग आली. प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला काल सायं 4 च्या सुमारास तब्बल 6 दिवसानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांनी स्वतः येऊन रस्त्याचे काम सुरू केले. दि 28 जानेवारी पर्यंत या रस्त्यासंबंधी पक्के काम सुरू करण्याचे लेखी आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. 

  मुख्याधिकाऱ्यांना काल सकाळी इमामपूर रोड भागातील संतप्त महिलांनी बांगड्यांचा आहेर नेऊन देताच मुख्याधिकारी हरकतीत आले. सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने व आरोग्याची, दळणवळणाची समस्या निर्माण झाल्याने बार्शी नाका, इमामपूर रोड भागातील बीडकर प्रचंड संतापलेले होते.आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे हे स्वतः व आपचे शहराध्यक्ष सय्यद सादेक, संघटन मंत्री ज्ञानेश्वर राऊत, सचिव रामधन जमाले तसेच कल्याण जाधव, जगदाळे योगेश, अशोक खरसाडे, भाऊसाहेब गलधर, अब्दुल समीर, दीपक ढोले, अशोक ढोले, दत्ता पवार, सुरेखा कडवकर, कमल कदम, शारदा रोहिटे, सावित्रीबाई घाडगे आदींसह येथील स्थनिक नागरिकांनी या ठिय्यात सहभाग घेतला होता.

      ठिय्या आंदोलन सोडतेवेळी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी गुट्टे, पेठ बीडचे विश्वास पाटील, दादासाहेब मुंडे, दत्ता जाधव, धनंजय गुंदेकर, सुनील सुरवसे, नगरसेवक उधान, लक्ष्मण इटकर आदींची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष अशोक येडेंच्या नेतृत्वाखाली छोट्याशा आप पक्षाने बीडकरांची मने जिंकली आहेत.No comments