Breaking News

माजलगावातून लुक्त झालेली चुन्नूमाची जत्रा; एक आठवण ..!

राज गायकवाड, माजलगाव

कदाचित शहरातील आजच्या वीसीतीसीतिल तरुण पिढीला  माहीत नसेल की आपल्या शहरात (उरूस) जत्रा भरत होती.आणि तीही अगदी शहराच्या एकदम मध्यभागी.

'होय...!'हा उत्साहवर्धक देखना योग माजलगाव शहराच्या नशिबी होता. जवळपास तीस पस्तीस  वर्षांपूर्वी माजलगावात चुन्नूमाँ(माय)ची जत्रा भरत होती.'चुन्नूमाँ'हा शब्दप्रयोग त्याकाळी मुस्लीम भाविकांनामधून ऐकला जात असायचा.आणि खेड्यापाड्यासह शहरातील हिंदू बहुजन भाविक 'चुनमाय'असे संबोधन करायचे.त्याकाळी तालुक्यासह परीसरात अपार श्रद्धा स्थान असलेली ही दर्गा लोकचर्चे नुसार 50 60 च्या दशकात माजलगाव शहरात वास्तव्यास आलेल्या चुन्नूमा या महिलेची याठिकाणी असलेल्या कबरीची  जागा आहे.चुन्नूमा शहरात हयात असताना त्यांच्या सहवासात आलेल्या,त्यांना पाहिलेल्या काही श्रद्धाळू नागरिकांच्या मते चुन्नूमा ही दैवी अंश आसलेली महिला होती. जिच्या आशीर्वाद युक्त वाणीतून अनेक दुःखी कष्टी कुटुंबांना लाभ झाला आहे.तर काही नागरिकांच्या मते चुन्नूमा एक भोळसर महिला होती.


ती दिवसभर शहरात फक्त भटकत राहण्याचे काम करत होती.चहा आणि बिडी या अत्यंत आवडीच्या गरजेसह जो देईल त्या अन्नदानावर  त्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी होत असायचा.असे दोन भिन्नमतप्रवाह असले तरी चुन्नूमा विषयी श्रद्धा बाळगणाऱ्याची संख्या त्या काळी मोठी होती.ज्याचा दृश्य परिणाम म्हणजे चुन्नूमाच्या निधनानंतर त्यांना दफन करण्यात आलेल्या जागेवर कबर बांधून त्या ठिकाणी दर्गा उभी करण्यात आली आहे.जी आजही चुन्नूमाचौक (आंबेडकर चौक) म्हणून सर्व परिचित असलेल्या परिसरात अस्तित्वात आहे.पुढे प्रघात पडून प्रत्येक गुरुवारी याठिकाणी मन्नत घेऊन येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत गेली. परिणामी कालांतराने या ठिकाणी जत्रा भरण्यास सुरुवात झाली.ती ही अगदी मराठवाड्यात नंबर तीन दोनच्या क्रमांकावर गणल्या जाणारी.

 हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या या जत्रेची लगबग डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू व्हायची. कडाक्‍याच्या थंडीचा वाढता कहर आणि जत्रेत खेळणी,फोटो स्टुडिओवाले,राहत पाळणे,तमाशावाले,मिठाईवाले,मीना बाजार वाले अशी जत्रेत बहर घेऊन येणाऱ्या बाहेरगावच्या पाहुण्यांची लगबग,हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातल चित्र.कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उरुस भरत असायचा.दरम्यान दर्ग्याची रंगरंगोटी करून दर्ग्यासह संपूर्ण परिसरात रंगीबेरंगी लाईटची  रोशनाई करून सर्वत्र अगदी झगमगाट पसरविल्या जात असायचा.ज्यामुळे परिसराला उत्साहाचं जणू भरतं येऊन निघायचं. रात्रभर तरुण मुलांसह किशोरवयीन पोरा बाळाच्या झुंडीच्या झुंडी याठिकाणी मिरवताना दिसत असायच्या.एक जानेवारी पासून (जत्रेची) उरुसाची सुरूवात होण्यापूर्वी त्याच दिवशी चुन्नूमाचे दोन संदल म्हणजे (मिरवणूक) काढले जायचे.एका संदलची सुरुवात शहरातील जुन्या भागातील झेंडा चौकातून व्हायची.


तर दुसरा संदल पांयडल रिक्षा वाल्यांकडून कडून जुना बस स्टँड परिसरात त्यांनी केलेल्या मन्नत नुसार काढण्यात यायचा.कारण त्यावेळी पांयडल रिक्षामधून सवारी/मालवाहतूक होत असायची.त्यामुळे रिक्षावाल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. आणि त्यांचं महत्त्वही तेवढंच होतं.हे दोन्ही संदल ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण शहरात मिरवले जायचे.

 ज्यामुळे शहरातील संपूर्ण वातावरण आनंदी-आनंदाने, चैतन्याने उत्सवाने ढवळून निघायचे. आणि एकदाला जत्रेला सुरुवात झालेली असायची.हा उरूस ही जत्रा भरण्याचे ठिकाण म्हणजे आजचे त्याकाळी मोकळे असलेले मैदान! सिद्धेश्वर शाळा- कॉलेज. याच परिसरातील सुतार गल्ली, हनुमान चौक, त्याकाळी सुरू असलेले जुने बस स्टँड समोरील मेन रोडसमोरचा भाग,आंबेडकर चौक याठिकाणी विविध व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडलेले असायचे. चुन्नूमा दर्गा भोवतीच्या परिसरात खवय्यांना आकर्षित करत विविध प्रकारच्या मिठायाचे स्टॉल स्थानिक व्यापार्‍यांसोबत बाहेर राज्यातून आलेल्या  व्यापाऱ्यांनी मांडलेले दिसायचे.


त्या स्टॉलवर फक्त जत्रेतच दिसून येणाऱ्या बाहेरच्या मिठायांची रेलचेल दिसून यायची.जी ग्राहकांना आपल्याकडं खेचल्यावाचून राहत नसायची. त्याला लागूनच चुन्नूमाच्या मदारीवर चढवण्यासाठी लागणारा गलब, फुले अगरबत्त्या,धुप,लोबान या वस्तूंची दुकाने थाटलेली असत. सोबतिला चुन्नुमाँच्या आवडीचा चहा आणि बीडीही असे. कारण तो दर्गा च्या नवसाचा  एक भाग मानण्याची प्रथा तयार झाली होती.दुकानातील आणि बाजुच्या दर्ग्यातून लोबानसुगंध परिसरात दरवळत असायचा.ज्यामुळे या ठिकाणचे वातावरण पावित्र्याने  डबडबून भरलेले जाणवायचे. त्यानंतर बाजूलाच दुसऱ्या लायनीत लहान मुलांसाठी खेळनी, तर महिलांसाठी सौंदर्यप्रसाधन बांगड्यावाल्यांचे चमचमीत स्टॉल तरुण मुली महिलांची गर्दी खेचून कायम रौनकदार दिसायचे.त्यामुळे या दुकानांच्या अवतीभवती तरुण मुलांचे घोळके बिना कामाचे जमलेले दिसायचे.

ज्या ठिकाणी आज सांगली बँक अस्तित्वात आहे त्या ठिकाणी फोटो स्टुडिओ उभारण्यात आलेले असायचे. त्यावेळी फोटो स्टुडिओची आजच्यासारखी रेलचेल झालेली नसल्यामुळे असे फोटो स्टुडिओ जत्रेत हमखास दिसून येत. ज्यामध्ये विविध फिल्मी कलाकारांचे अमिताभ, धर्मेंद्र, मिथुन, विनोद खन्ना, जितेंद्र यांचे पेंटिंग कटआउट उभे असायचे ज्यांच्या सोबत त्याकाळी हौशी तरुणाई फोटो काढत.त्याच स्टुडिओत एखादी मोटरसायकल, एखादी मोटारकारचा ढाच्या उभा असायचा, ज्यावर नवीन लग्न झालेले एखादं हौसी जोडपं डबल सीट फोटो काढायचं.

लहान किशोरवयीन मुलंही फोटो काढून आपली मोटरसायकलवर बसण्याची हौस भागवून घ्यायचे.तर काही पारिवारिक फोटो काढले जायचे,जे की ब्लॅक अँड व्हाईट असायचे.  परंतु त्या काढलेल्या फोटोची अपूर्वाई आजच्या सेल्फीच्या जमान्यात आजही घडद आणि जिवंत असल्यासारखी वाटल्या शिवाय राहत नाही.फोटो स्टुडिओना लागूनच मौत का कुवा,राहत पाळणे, स्वतंत्र मीना बाजार यांची रेलचेल असायची.याकाळात शहरातील मुख्य रस्त्यावर रहदारीची दाटी ओसंडून वाहत राहायची. रस्त्यावरील प्रत्येक हॉटेल विद्युत रोषणाई करून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी गजबजलेल्या दिसायच्या.दगडावर कढई मांडून उकळत्या तेलातुन गरमागरम जिलेबी भज्याचा सुटलेला खमंग सुगंध जिभेला पाणी सोडत ग्राहकांना खेचताना दिसून यायचा. सोबतीला जामुन, बालुशाही, चटकदार झणझणीत चिवडा  हे पदार्थ ही इशाऱ्यातून आपली चव चाकन्यास ग्राहकांना भाग पाडायचे.


अस्सल चाय शौकिनांसाठी वाफाळता'रॉयल'आणि 'बर्कली' नावाचा चहा.शहरात यावेळी प्रसिद्ध होता.रॉयलचहा म्हणजे सतत खिसा गरम असणाऱ्यांचा तर बर्कली चहा म्हणजे मोलमजुरी करून शौक भागविणारांचा.

किमतीत कमीजास्त असला तरी तो खरोखरचा अमृततुल्य चहा होता.जो कितीही प्याला तरी पेयुच वाटायचा. मोकळ्या खंडोबा मैदान परिसरात नावाजलेले तमाशाचे फड उभे असायचे.ज्याची मोज लुटण्यासाठी तालुक्यातून तालुक्याच्या आजुबाजुच्या ग्रामीणभागातून आलेला खास प्रेक्षक खच्चून गर्दी करायचा.त्यात फुकट्या रसिकांचीही कमी नसायची.  दत्तोबा तांबे,काळू बाळू,भिका भीमा, यांच्या रंगमंचावर अनेक तमासगीरगिरांचा भोंग्यावरून अस्सल मराठी लावणीचा ताल, शिवराळ विनोदाची जुगलबंदी वगाचा सुर,हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कलकलाट सुरू असायचा. याच परिसरात दिवसाच्या उजेडात कुस्तीचे फड पिळदार मल्लांसह नवशिक्या कुस्तीगिरांना मातीत लोळव्ताना दिसायचे. तर शहरात असलेल्या डक यांच्या श्रीराम चित्रपट ग्रहाने व शहराच्या बाहेर अंतर राखून उभारण्यात आलेल्या राठोर यांच्या लक्ष्मी चित्रपट ग्रहाने,साबळे यांच्या केशवराज चित्रपट गृहाने चित्रपट शौकिनांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जत्रा स्पेशल नवनवीन चित्रपटाची मेजवानी दिलेली असायची.कारण त्यावेळी चित्रपट रिलीज झाल्यानंतर तब्बल दोन-तीन वर्षानंतर तालुक्या सारख्या ठिकाणी नविन चित्रपट येण्याची वाट पाहावी लागायची. त्यामुळे अशा जत्रेतून चित्रपट पाहण्याची उत्सुकता चित्रपट शौकिनांना लागून राहिलेली असायची.


अशावेळी दाम चौकट करण्याच्या उद्देशाने पिक्चर टॉकीज चे मालक आपल्या टॉकीजला लागलेल्या चित्रपटाच्या जाहिरात बाजीसाठी मैदानात उतरलेले असायचे.यावेळी मुद्दामून करण्यात आलेल्या रोषणाईच्या प्रकाशात चित्रपट ग्रह नव्या नवरीसारखी सजलेली दिसून यायची. दुसरीकडे जुना बस स्टँड परिसरात शानदार कवाली मुकाबला सुरू असायचा. स्त्री पुरुषांचा मंचावरील हा सवाल-जवाबांचा सामना पाहण्यासाठी महिला पुरुष गर्दी करताना दिसायचे.आशा सदाबहार वातावरणात जत्रेचा उत्साह शिगेला पोहोचताना दिसत असायचा. शहरात जिकडे पहावे तिकडे माणसाचे कळपच कळप दिसून यायची.एक जानेवारी पासून सुरू झालेली जत्रेची धूम लुटण्यासाठी शहरात वाढणारी गर्दीवर नियंत्रण ठेवन्याचे प्रशासना समोर मोठे आव्हान रहायचे.

आठवड्याभर हा फेवर कायम राहायचा. सनावाराप्रमाणे शहरातील प्रत्येक जाती-धर्माच्या घरातील लेकमात आपल्या यजमानासह सासरच्या लोकांना आपल्या गावी घेऊन आलेली असायची.पोटापाण्यासाठी बाहेर पडलेला गावातील व्यक्ती जत्रेनिमित्त हजारो कामे सोडून याठिकाणी आलेला दिसायचा.तर बाहेरगावची मित्र कंपनी "काय मित्रा, देतोस का जत्रेचे गावाकडे यायला निमंत्रण"असं म्हणून हक्काने आग्रह करायची. गोरगरीब श्रीमंतांच्या प्रत्येक घरात पाहुन्या राहुळ्यांची वाढलेली रेलचेल ऐपती प्रमाणे प्रत्येक जण संभाळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा. कारण हा उत्सव शहराच्या मातीसी एकरूप झालेला असायचा. व्यापारासी जोडलेला असायचा. दरम्यानच्या काळात हजारो स्थानिक लोकांना दोन पैसे मिळवून देणारा असायचा.या सर्वांसह शहर तालुक्याचे नाव आजूबाजूच्या चार पाच जिल्ह्यात चर्चा घडवून आणणारा ठरायचा.अशी माजलगाव तालुक्याची शहराची कल्चर फेस्टिवल ठरणारी चुन्नूमाची (उरूस) जत्रा एक ठेव म्हणुन शहरवासीयांच्या मनात जिवंत आहे. काळाच्या ओघात ती केव्हा लुप्त झाली हे समजले नसले तरी प्रत्येक वर्षात येणाऱ्या जानेवारीत ती 'एक आठवण' म्हणून सदैव तेवत आहे.

No comments