Breaking News

अवैध वाळूच्या टिप्परने निष्पाप शेतकऱ्याच्या जीव गेल्याप्रकरणी तलाठी व मंडळअधिकारी यांना तात्काळ निलंबित करा - दत्ता जाधव


गेवराई :  तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन जवळ गंगावाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने निष्पाप रुस्तुम बाबाजी मते या शेतकऱ्यास चिरडले असून,अवैध वाळू उपसा करू देणाऱ्या संबधीत राक्षसभुवन, धोंडराई,खामगाव तलाठी सज्जाचे तलाठी व धोंडराई मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी याना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी युवानेते दत्ता जाधव यांनी केली आहे.

 


   याबाबत सविस्तर माहिती अशी की,४ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास शेतकरी रुस्तुम मते,रा.गंगावाडी हे आपल्या शेतात जात असताना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने भरधाव वेगाने सदर शेतकऱ्यास चिरडल्याची घटना घडली.जिल्हाधिकारी यांनी गोदावरी नदीपात्रात कुठलेच वाळू घाट खुले केलेले नसतानाही,या परिसरातुन अवैध वाळू उपसा बेसुमार दररोज होत आहे.या बेसुमार वाळू उपस्यास तलाठी,मंडळअधिकारी हे जबाबदार असून,यांचे वाळूचोराशी आर्थिक संगनमत झालेले आहे.या परिसरात हजारो ब्रास वाळू उपसा होतो,आणि या वाळू उपश्याची माहिती तलाठी व मंडळ अधिकारी यांना नसावी,एवढी दूधखुळी जनता नाही.अवैध वाळू उपसा होऊ दिल्यामुळे आज एका निष्पाप शेतकऱ्याचा मृत्यू झाला.अवैध वाळूच्या टिप्परने निष्पाप शेतकऱ्याच्या जीव गेल्याप्रकरणी तलाठी व मंडळअधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी दत्ता जाधव यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
No comments