Breaking News

पाणी आणण्यासाठी गेलेल्या पारधी महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू : दोन अल्पवयीन मुले झाली अनाथ

गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील केवड येथे पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका पारधी समाजातील महिलेचा विहिरीत पाय घसरून झालेल्या अपघातात तिचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. तिची दोन अल्पवयीन मुले अनाथ झाली असल्याने भटक्या समाजाच्या वस्त्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केवड ता. केज येथे दि. १७ जानेवारी रविवार रोजी सकाळी ८:३०  वा. पारधी वस्तीवर राहत असलेली अनिता अनिल शिंदे वय २१ वर्ष ही विवाहित महिला त्यांच्या वस्तीजवळ असलेल्या सतिश गोवर्धन सपाटे यांच्या शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. विहीरीवर पाणी भरीत असताना ती पाय घसरून विहिरीत पडली. त्यामुळे पाण्यात बुडवून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान केज तालुक्यातील अनेक आदिवासी समाजातील वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्रशासनही त्यांच्या मूलभूत गरजा याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील अशा वस्त्याचे सर्वेक्षण करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

आईच्या मृत्यूमुळे दोन अल्पवयीन मुले झाली पोरकी

विहिरीत बुडून मृत्यमुखी पडलेल्या दुर्दैवी अनिता  हिला एक दोन वर्षाचा मुलगा व एक केवळ अडीच महिन्याची मुलगी असल्याने आईविना पोरकी लहान मुले आक्रोश करीत असल्याचे पहावत नाही.No comments