Breaking News

सहा.आयुक्त सचिन मडावी यांना निलंबित करा .....अन्यथा 26 जानेवारीला मुख्यमंत्री यांना साडी चोळीसह बंगड्याचा आहेर देणार- अजय सरवदे


बीड :
समाज कल्याणच्या विविध योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी केल्यानंतर आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात बीडचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी दोषी आढळून आले. मात्र त्यांच्यावर  कारवाई केली जात नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अजय सरवदे यांनी आज राज्याचे समाज कल्याण विभागाचे सचिवांना बांगड्या- पायातील चेनसह निवेदन पाठवून निषेध करीत सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी न केल्यास मुख्यमंत्र्यांना साडी-चोळीचा आहेर करण्यात येईल, असा इशारा पत्रपरिषदेतून दिला. 

जात पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी डॉ. सचिन मडावी यांच्याकडे बीडच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.  डॉ. मडावी यांच्या गैरकारभार बद्दल सामाजिक कार्यकर्ते अजय सरवदे यांनी समाज कल्याणचे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे तक्रार करीत त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीची शपथपत्राद्वारे मागणी केली होती.  त्यानुसार अतिरिक्त आयुक्त यांनी बीडच्या समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. मडावी यांची चौकशी करण्याचे आदेशित केले होते. दरम्यान चौकशी समितीने प्रभारी सहाय्यक आयुक्त सचिन मडावी हे प्रथम दृष्ट्या दोषी आढळून आले असून त्यांच्यावर नियमबाह्य खरेदी केल्याचा ठपका ठेवून त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस आयुक्तांकडे केली होती.


त्यातच स्वयंसहाय्यता बचत गटात जुने ट्रॅक्टर वाटप, दादासाहेब सबलीकरण योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुधार योजनेच्या माध्यमातून विटंबना, लाभार्थ्यांची तपासणी न करता निधीचे वितरण अशा विविध योजनांमध्ये डॉ. सचिन मडावी यांनी भ्रष्टाचार केल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर अजय सरवदे यांनी पुन्हा शपथ पत्राद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे शपथपत्र सादर करून डॉ. मडावी यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीची पुन्हा मागणी केली.  सदर प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून चौकशी समितीने दुसऱ्यांदा प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. मडावी यांना दोषी ठरवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली होती. 18 डिसेंबर 2020 रोजी समाज कल्याण आयुक्त यांनी कारवाईच्या शिफारशीसह समाज कल्याणचे सचिव यांना आपला अहवाल सादर केला. 

तसेच अजय सरवदे यांनी 7 नोव्हेंबर 2020 रोजी आयुक्त यांच्या अहवालाच्या अनुषंगाने प्रभारी आयुक्त डॉ. मडावी व अन्य कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात यावे. यासाठी शपथपत्र दाखल केले होते. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांनी मात्र गेल्या 57 दिवसापासून प्रकरण प्रलंबित ठेवलेले असून डॉ. मडावी यांनी भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झालेले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सरवदे यांनी करत भ्रष्ट अधिकारी डॉ. मडावी यांना पाठीशी घालण्याचं काम समाज कल्याण विभागाचे सचिव करत तर नाहीत ना? डॉ. मडावी यांच्यावरील कारवाईस उशीर केला जात असल्याने आज सचिवांना बांगड्या व पायातील चेन भेट देण्यात आली असून  डॉ. मडावी यांच्यावर प्रजासत्ताक दिनापूर्वी निलंबित न केल्यास न केल्यास मुख्यमंत्र्यांना साडी- चोळीचा आहेर करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


No comments