Breaking News

जोडलेला माणूस कायमचा आपला कसा राहिल याची शिकवण देणारे स्व गोपीनाथरावजी मुंडे - आ. सुरेश धस


के.के. निकाळजे । आष्टी 

आयुष्यात जोडलेला प्रत्येक माणूस कायमचा आपला कसा राहिल याची शिकवण देणारे स्व.गोपीनाथरावजी मुंडे होते.हजरजवाबी,उत्कृष्ट वकृत्व,आणि कायम सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तळमळीने झटणारे असामान्य नेतृत्व म्हणजे स्व. मुंडे असल्याचे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले ते आष्टी शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात आयोजीत मुंडे यांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे,कडा कृषी उ. बा. स. सभापती दत्ताञय जेवे, पं. स.  सभापती बद्रीनाथ जगताप, उपसभापती रमेश तांदळे, व्यापारी संघटनेचे संजय मेहेर, अमोल तरटे, प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, नगराध्यक्ष भारत मुरकुटे,आत्माराम फुंदे, रंगनाथ धोंडे आदी मान्यवर उपस्थीत होते.

पुढे बोलताना आ.धस यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देताना राजकारणात कोणी कोणीचा कायमचा शञू नसतो जो आज आपल्या विरोधात आहे तोच उद्या आपला होईल असे सांगत राजकारणा पलिकडे मैञीचे नाते कायम कसे टिकवता येते याचे उदाहरण म्हणजे स्व.मुंडे होते.स्व.विलासराव देशमुख आणि स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचे पक्ष दोन्ही विरोधी विचारसरणीचे होते माञ त्या पलिकडे जाऊन त्यांनी त्यांची मैञी टिकवली.तसेच स्व.मुंडे हे जेव्हा पहिल्यांदा जामगाव येथे येऊन भाषण करत होते.त्यावेळेस मी शालेय जिवनात होतो त्यांचे भाषण सुरु असताना मुंडे साहेबांच्या डाव्या हाताच्या बोटाला धरुन त्यांच्या बाजूला उभा राहिलेला मी आहे.त्यावेळेस स्व.मुंडे हे मिश्कीलपणे माझ्या वडीलांना म्हणाले होते कि दादा तुम्ही काॕग्रेसमध्येच रहा पण सुरेशला मला द्या आणि योगायोगाने मी भविष्यात त्यांच्या सानिध्यात आलो.तदनंतर राजकारणात अनेकदा तर मुंडे साहेबांसोबत काहीवेळा त्यांच्या गाडीचे सारथ्य देखील मी केले.

समाजहिताचा, पक्षहिताचा,ऊसतोड मजूरांच्या दरवाढीचा असा कोणताही निर्णय घेत असताना त्यांनी प्रत्येकवेळी सर्वांशी चर्चा करुनच निर्णय घेणारे नेतृत्व मुंडे साहेबांचे होते.अल्पसंख्यांक समाजाला देखील मुंडे आपले वाटायचे कारण त्यांनी कधीच जातीपातीच राजकारण केले नाही.युती अबाधित राहिली पाहिजे यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या व्यक्ती बरोबर देखील स्व.मुंडे - महाजन यांची मध्यस्थीची भूमिका वाखाणन्याजोगी होती.आयुष्यात कायम संघर्षच या माणसाच्या वाट्याला आला माञ त्या संघर्षाला न जुमानता त्यांनी त्यांची वाटचाल सुरु ठेवली होती.माञ नियतीने त्यांच्यावर घाला घातला आणि देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला मुकण्याची वेळ आपल्यावर आली हे आपले दुर्भाग्य असल्याचेही शेवटी आ.धस म्हणाले.यावेळी प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,संजय मेहेर,भाऊसाहेब लटपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार  नगराध्यक्ष भारत मुरकुटे यांनी मानले.

No comments