Breaking News

महाविकास आघाडी सरकारचं चौथं चाक म्हणजे महाराष्ट्राची जनता – मुख्यमंत्री


मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर सुरुवातीला तीन चाकाचं सरकार म्हणून टीका झाली. हे तीन चाकाचं सरकार टिकणार नाही, असंही बोललं गेलं. पण विरोधकांना हे लक्षात आलं नाही की या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत. महाविकास आघाडी सरकारचा वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “जनतेचा आशीर्वाद का मिळतोय कारण जनतेला माहिती आहे की, हे सरकार केवळ राजकारण करण्यासाठी एकत्र आलेलं नाही. सुरुवातीला आपल्यावर टीका झाली होती की हे तीन चाकाचं सरकार आहे. पण त्यांच्या हे लक्षात आलंच नाही की या सरकारचं चौथ चाक जे आहे ते आपल्या जनतेच्या विश्वासाचं आहे. जनतेच्या विश्वासामुळं आपण हा सरकाररुपी रथ पुढे नेऊ शकलो आहोत. सरकारवर  जर जनतेचा विश्वासच नसता तर आपण पुढे चालूच शकलो नसतो. आपल्याला विरोधकांची गरजही पडली नसती.”

“गेल्या वर्षभरात जे आमचं टीमवर्क झालं आहे. ते पाहिल्यानंतर हे सर्व माझे सहकारी त्यात सर्व अनुभवी आहेत. अनुभव नसणारे कोणी नसतील असं त्यांच्या कामावरुन वाटतंच नाही. सगळेच जण फार छान काम करत आहेत. वर्षभरापूर्वी अनेकांना असं वाटतं होतं की हे सरकार अस्तित्वाच येऊच शकत नाही. शिवसेनेला ते गृहित धरुन चालत होते. की शिवसेना फरफटत येणारच. पण शिवसेना कधीही फरफटत जाण्याऱ्या पक्षापैकी आधी नव्हती, उद्याही नसेल आणि कधीच नसणार,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं.

“एका गोष्टीचं मला आश्चर्य म्हणा किंवा आनंद आहे, समाधान आहे. आपले तीन्ही पक्ष आणि आपले सहकारी जे अपक्ष म्हणून निवडून आले. हे सर्व वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत. आपल्याला एकमेकांशी संघर्ष करण्याचा खूप अनुभव आहे. एकमेकांशी संघर्ष करत आपण इथंपर्यंत आलो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की, संघर्ष केल्यानंतर आपण काय गमावतो आणि एकत्र आल्यानंतर आशीर्वाद कसे कमावतो याचा आपण एक वर्ष अनुभव घेत आहोत. यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


No comments