Breaking News

उदंड वडगावमध्ये बिबट्याचा वगारीवर हल्ला


आशिष सवाई । मांजरसुबा 

बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील सुदाम चव्हाण यांच्या वगारीला बिबटया ने मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता पकडले. परंतु  बंकट स्वामी नगर वासियाच्या सतर्कते मुळे मोठा अनर्थ टळला.

गावाच्या शिवारात अनेकांना या श्वापदाचे दर्शन घडले आहे. मागील दोन दिवसापासून या बाबत अनेकांनी पुष्टी दिली होती परंतु कोणी गंभीरतेने घेतले नाही. शेवटी मंगळवारी रात्री  बिबटयाने हल्ला करून या चर्चेला पूर्णविराम आणि त्याच्या अस्तित्वाचा पुरावा दिला.उदंड वडगाव तहत बंकट स्वामी नगर वस्तीवर सुदाम दशरथ चव्हाण हे  मंगळवारी रात्री आपल्या कोट्यासमोर म्हशी व वगारीला बांधून ओट्यावर झोपले होते. सव्वा अकराच्या सुमारास शेतातील पिकात घात लाऊन बसलेल्या बिबट्याने वगारीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्लाने जनावरांनी एकच कल्ला केला त्यामुळे सुदाम चव्हाण जागे झाले आणि त्यानी आरडाओरड केली. त्यामुळे वस्तीवरील लोक जागे झाले. लोकांचा आवाज ऐकून बिबटयाने वगारीला सोडून पूर्वेला नदीच्या दिशेने पळ काढला. बुधवारी सकाळीही काही ग्रामस्थांना त्याचे दर्शन झाले आहे.

अनेकांच्या भिजवलेल्या शेतात त्या बिबटयाचे ठसे दिसून येत आहेत.त्यामुळे ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी सरपंच राजेश पांचाळ,तलाठी राऊत,ग्रामसेवक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. वनविभागाला याची कल्पना दिली आहे, असे राजेश पंचाळ यांनी सांगितले. वनविभागाने याची दखल घेऊन या बिबट्याचा मोठा अनर्थ घडण्याआधी बंदोबस्त करावा अशी मागणी  शंकर चव्हाण यांनी केली आहे.


No comments