Breaking News

आरक्षणासाठी ओबीसींचा बीडमध्ये विराट मोर्चा !


परंपरागत व्यवसायासह ओबीसी बांधव मोर्चात सहभागी 

बीड : आरक्षणासाठी व ओबीसींच्या हक्क अधिकारासाठी बीडमध्ये  समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा मंगळवारी काढण्यात आला. या मोर्चात प्रतिकात्मक स्वरूपात ओबीसींमधील जाती आपल्या परंपरागत असलेल्या व्यवसायासह सहभागी झाल्याचं दिसत होतं. आंदोलनकार्यांनी दिलेल्या घोषणांनी बीड शहर दणाणून गेलं होतं. 

कृषी कायद्या विरोधात शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. दरम्यान या बंदला महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना बीडमध्ये मात्र ओबीसींच्या हक्क - अधिकारासाठी व आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी समता परिषदेचे ऍड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून "जय ज्योती, जय क्रांती", अशी गगनभेदी घोषणा देऊन या मोर्चाला सुरवात करण्यात आली. 

मोर्चात ओबीसींमधील विविध जाती आपल्या पारंपरिक व्यवसायासह सहभागी झाल्यानं बीडकरांचे ते लक्ष वेधून घेत होते. या मोर्चात मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव सहभागी झाले होते. आरक्षण आमच्या हक्कचं, नाही कुणाच्या बापाचं, उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, अर बघता काय शामिल व्हा... अशा गगनभेदी घोषणांनी बीड शहर दणाणून गेले होते. 


No comments