Breaking News

महापुरुषांच्या जयंतीदिनी ध्वजारोहण, उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचा सन्मान करावा


जिल्हा परिषद सभापती सविताताई मस्के यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मांडला ठराव

गेवराई :  छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यासह थोर महापुरुषांच्या जयंतीदिनी शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात ध्वजारोहण करुन त्यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम आयोजित करुन त्याची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनापासून करण्यात यावी. जिल्ह्यात प्रशासन, शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा दरवर्षी सन्मानचिन्हासह गौरव करण्यात यावा. तसेच कोविडच्या काळात शिक्षकांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचाही कोविड योध्दा म्हणून सन्मान करावा. यासाठी जिल्हा परिषदेत विशेष फंड देण्याची तरतूद करावी असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी मांडला. यानंतर या ठरावला सर्वानुमते अनुमती मिळाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी तो पारीत देखील केला.

   


 

बीड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार दि.24 रोजी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांच्याकडे मांडलेल्या ठरावात सभापती सविताताई मस्के यांनी म्हटले आहे की, स्वतंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, मराठवाडा प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आदी दिवशी ध्वजारोहण करुन कार्यक्रम आयोजित करण्यात येते. त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, संत रविदास महाराज यासह इतर थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त देखील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करुन या महापुरुषांच्या विचारावर कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. जेणेकरून त्यांच्या महान विचारांना उजाळा मिळेल, व नवपिढींच्या मनामध्ये त्यांचे विचार रुजले जातील. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनापासून करण्यात यावी.


त्याचबरोबर पुणे, अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये दरवर्षी जिल्हास्तरीय उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांची निवड करुन त्यांना गौरविण्यात येते. त्याच धर्तीवर आपल्या बीड जिल्हा परिषद मध्ये देखील जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांची दरवर्षी निवड करुन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा. त्याचबरोबर सन 2020 च्या सुरुवातीला कोविड या महामारीने थैमान घातले. या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस आदींने मोठे योगदान दिले आहे. याचप्रमाणे आपल्या शिक्षकांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे. चेकपोस्टवर कार्य, किराणा घरपोहोच, रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात त्यांचे  मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा कोविड योध्दा म्हणून जिल्हास्तरावर कार्यक्रम आयोजित करुन सन्मान करण्यात यावा हा देखील ठराव सर्वसाधारण सभेत ऐनवेळ विषयात सभापती सविताताई मस्के यांनी मांडले.

यासाठी जिल्हा परिषद मध्ये विशेष फंडाची तरतूद करण्यात यावी असा ठराव सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी मांडला. यानंतर या विषयाला सर्वसाधारण सभेत सर्वानुमते अनुमती दर्शविल्याने तो तात्काळ पारीत देखील करण्यात आला. या सभेत सभापती सविताताई मस्के यांनी तीन महत्त्वाच्या विषयांवर ठराव मांडल्याने या सर्वसामावेशक ठरावाची चांगलीच चर्चा झाली.


No comments