Breaking News

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंबंधी साखर आयुक्तांशी आ.सुरेश धस यांनी केली चर्चा


कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याची केली आयुक्तांकडे मागणी

के. के. निकाळजे । आष्टी  

राज्यातील सबंध ऊसतोड कामगारांच्या विविध समस्यांवर सोमवारी आ.सुरेश धस यांनी पुणे येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा करत कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील जवळपास १९२ पेक्षा जास्त साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून राज्याच्या विविध भागातून ऊस तोडणी कामगार कारखाना परिसरात आलेले आहेत. साखर कारखाना सुरू होण्यापूर्ण राज्य शासनाने व साखर संघाने कारखाना प्रशासनाला गाळपाची परवानगी देण्यापूर्वी कारखाना स्थळावर व परिसरात काम करणा-या ऊसतोडणी व वाहतूकदार कामगार यांना मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते.त्यामध्ये कामगारांसाठी आरोग्य, पिण्यासाठी शुद्ध पाणी, शौचालये व सध्या कोरोना उपचार आणि विमा संरक्षण अशा अनेक प्रकारच्या मागण्या सर्व मजूर संघटना आणि आम्ही केलेल्या होत्या.राज्यातील २२ साखर कारखान्यांवर भेटी दिल्या असता, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जिल्हा पुणे, दौड शुगर लिमिटेड जिल्हा पुणे आणि राजारामबापू स.सा.का, इस्लामपूर जि सांगली हे तीन कारखाने वगळता अन्य कारखान्यांवर कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत असे दिसून आले आहे.यामध्ये महिलांचे शौचालय कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आले त्यामुळे मजुरांना उघड्यावर शौच करावी लागते आहे. महिला वर्गाची फार मोठी कुचंबना होत आहे त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे त्यामुळे या मजुरांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तरी संबंधित कारखाना प्रशासनानी चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी साखर आयुक्त यांचेकडे केली आहे.

तसेच सद्यस्थितीत प्रामुख्याने ऊसतोडणी व वाहतूक करणारे मजूर हे देखील माणूसच आहेत, हाडामासाच्या या माणसाांना माणूस म्हणून वागवण्यात आले पाहिजे तसेच त्यांच्या  आयुष्यातील आजची व्यथा ही जनावरांपेक्षाही वाईट झालेली असून त्यामुळे त्यांना पिण्याचे व वापरण्याचे पाणी,राहण्यासाठी चाांगली जागा, आरोग्यासाठी दवाखाना, फिरते व कायमस्वरूपी सुलभ शौचालये उभारणी,कारखाना ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना प्रवेश,दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचे वाढते स्थलांतर याचा सर्वे करून तात्काळ उपाययोजना राबविणे,तसेच covid-१९ अंतर्गत उपचार या सर्व मागण्या मंजूर होण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाने तात्काळ आदेश करुन द्यावेत व वरील उपाय योजना करण्यात कुचराई झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची देखील मागणी आ.धस यांनी साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे.
No comments