Breaking News

एका लढवय्या सूर्याचा अस्त... नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष ॲड.सुधीर पिसे यांचे निधन


 

जगदीश गोरे । वडवणी

नामदेव समाजोन्नती परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाचे उपाध्यक्ष, इस्लांमपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, व महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड.सुधीर सिताराम पिसे (वय ६९ वर्षे) यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वडवणी शहरातील शिंपी समाज बांधवांच्या वतीने शोकसभा घेवून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

                   

दिवंगत ॲड.सुधीर सिताराम पिसे हे इस्लांमपूरच्या राजकारणात गेली अनेक वर्ष ते जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक राहिले होते. दि.१ डिसेंबर १९९१ ते १ एप्रिल १९९३ या कालावधीत त्यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्षपद भूषविले होते. एक यशस्वी उद्योजक, राजकारणी व समाजासाठी जपणारे म्हणून त्यांची ओळख होती. संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी सलग २० वर्षे नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्षपद भुषविले असून त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीमध्ये महाराष्ट्रास भूषण वाटावे अशी अनेक सामाजिक कार्यात ते कायमच अग्रेसर राहिले. यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाव्दार स्मारक उभारणी, नामदेव शिंपी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश, नामदेव स्मारकासाठी १५ कोटी शासनाकडून मंजुरी मिळवून ६० कोटीचा आराखडा शासनास सादर केला आहे. अशी अनेक भरीव कामे त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक समाजहिताची कामे पूर्णत्वाला गेली आहेत. त्यांच्या निधनामुळे शिंपी समाजाचे नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्राचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. अशी माहिती नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर अध्यक्ष संदीप लचके व सचिव सुभाष मुळे यांनी संयुक्तपणे दिली. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी रविवार दिनांक ६ रोजी सकाळी नऊ वाजता उरुन इस्लांमपूर येथे होणार आहे. 

वडवणीत समाजबांधवांकडून श्रध्दांजली अर्पण 

वडवणी शहरात शिंपी समाजाच्या वतीने नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष ॲड.सुधीर पिसे यांचे निधन पश्चात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी दिवंगत ॲड.सुधीर पिसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी वडवणी येथील नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य गुरुप्रसादजी माळवदे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कैलासराव पाटसकर, नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर फुटाणे, शासकीय अधिस्विकृतीधारक जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांनी दिवंगत ॲड.सुधीर पिसे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आपला शोकसंदेश व्यक्त केला.


No comments