Breaking News

विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा होणार सत्कार - आ.सुरेश धस

 

के. के. निकाळजे । आष्टी  

ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत रोजगार सेवक ते गटविकास अधिकारी यांचे सह सरपंचांनी समन्वयाने आणि सकारात्मक पद्धतीने कामे केली तर ग्रामीण भागाचा कायापालट होईल मात्र याकडे आळशीपणा ने पाठ फिरवणा-या ग्रामसेवकांनी योजनेअंतर्गत लोकसंख्येनुसार विहिरींच्या कामांचा समावेश करून 14 तारखेपर्यंत कृती आराखडे सादर करण्यात कुचराई केल्यास बुधवार दिनांक 16 डिसेंबर रोजी पंचायत समिती आवारात संबंधित ग्रामसेवक यांचा यथोचित सत्कार करण्यात येईल असा इशारा आ. सुरेश धस यांनी दिला आहे.नरेगा अंतर्गत ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत सादर करावयाच्या कृती आराखड्याबाबत ग्रामसेवक सरपंच यांच्या संयुक्त बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ.सुरेश धस बोलत होते.यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे सभापती बद्रीनाथ जगताप उपसभापती रमेश तांदळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्ता जेवे, उपसभापती शिवाजी अनारसे दूध संघ अध्यक्ष संजय गाढवे उपाध्यक्ष आत्माराम फुंदे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. धस म्हणाले की महात्मा गांधी नरेगा अंतर्गत ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत बदल होऊन यापुढे लोकसंख्येवर आधारित सिंचन विहिरी मंजूर करण्यात येणार आहेत.त्यामुळे विहिरी,शाळा,वृक्षलागवड,रस्ते यांचे सामूहिक आणि वैयक्तिक लाभार्थी निवडून कृती आराखडे तात्काळ सादर करावेत.आष्टी तालुक्यासाठी 1 हजार 305 विहिरींचे उद्दिष्ट असून अद्याप केवळ 750 लाभार्थी निवडले गेले आहेत.आणखी 550 लाभार्थी निवडून संबंधित प्रस्ताव दाखल करावेत यात हयगय होऊ नये.यापूर्वी आपण या विभागाचे राज्यमंत्री असताना या योजनेचे शासन निर्णयात बदल करून काही पथदर्शी प्रकल्प राबविल्यामुळे तालुक्यात डाळींब संञा या फळबागांचे क्षेञ वाढले आहे.

सकारात्मकतेने सर्वांनी समन्वय ठेवल्यास अनेक कामे यशस्वी होत असतात मनरेगा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत माननीय मंत्री संदिपान भुमरे आणि प्रधान सचिव नंदकुमार जंत्रे हे अत्यंत सकारात्मक असल्यामुळे या कामांची व्याप्ती वाढणार आहेत त्यांचे हे काम अभिनंदनीय आहे हे विरोधी पक्षात असलो तरी सांगण्यास कमीपणा वाटत नाही. पुरवणी आराखड्याबरोबर सन 2020र-21 च्या आराखड्यामध्ये दीड पटीने लाभार्थी निवडून कामांना मंजुरी घ्या.तर हि कामे देखील मार्च 2021 मध्ये मंजूर होऊन एप्रिलमध्ये सुरू करता येतील.सर्व धर्म आणि जातींमधील गरजू लाभार्थींना निवडताना कोणताही राजकीय अभिनिवेश बाळगू नका आज विरोधी असला तरी तरी उद्या मदत करेल.आदिवासी पारधी यांना ही जागा मिळवून द्या त्यांच्याही जीवनात विकासाची पहाट होऊ द्या मनरेगा मध्ये पाझर तलाव दुरुस्ती,समतल चर खोदकाम,तलाव सांडवा, दुरुस्ती बांधबंदिस्ती या कामांकडे सरपंच आणि ग्रामसेवकांनी बारकाईने लक्ष द्यावे असेही आ.धस म्हणाले.


No comments