Breaking News

माथाडी कामगारांच्या धर्तीवर ऊसतोड कामगार कायदा अस्तित्वात आणणार - सामाजिक न्यायमंत्री मुंडेंची घोषणा


मी ऊसतोड कामगाराचा मुलगा; सामाजिक न्याय विभागाकडून ऊसतोड कामगारांना विशेष सहाय्य मिळवून देणार - धनंजय मुंडे

मुंबई  : माझे वडील स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी एके काळी ऊस तोडलेला आहे, मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांची, अडचणींची जाणीव आहे त्यामुळेच ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची जबाबदारी मी सामाजिक न्याय विभागाकडे मागून घेतलेली आहे. ऊसतोड कामगारांना सामाजिक न्याय विभागाकडून विशेष सहाय्य मिळवून देणार आहे; असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्यांवरील विधानपरिषदेत चर्चे दरम्यान आ. सुरेश धस, आ. विनायक मेटे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरावर ना. मुंडे बोलत होते.लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची नोंदणी प्रक्रिया सुरू असून, नोंदणी नंतर त्याची रचना, कार्यालय, धोरण आदी सर्व गोष्टी सर्वांना विचारात घेऊन ठरवण्यात येतील, असेही ना. मुंडे यावेळी म्हणाले.

माथाडी कामगार कायद्याप्रमाणे ऊसतोड कामगारांसाठी येत्या अधिवेशनात कायदा अस्तित्वात आणणार असल्याची घोषणाही यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. भाजपच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची काहीही कार्यवाही करण्यात आली नाही, २०१९ मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केवळ घोषणा केली, महाविकास आघाडीचे सरकार मात्र नोंदणी पासून ते सर्व प्रक्रिया बारकाईने हाताळत आहे, असेही मुंडेंनी म्हटले आहे.

दरम्यान ऊसतोड कामगार नोंदणी, आरोग्य विमा संरक्षण या बाबी येत्या काही दिवसात पूर्ण करून, ऊसतोड कामगार कायदा येत्या अधिवेशनात अस्तित्वात आणू अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये सेंट्रल किचन योजना सुरू करणार

सामाजिक न्याय विभागाच्या सर्व वसतिगृहांमध्ये सेंट्रल किचन योजना राबविणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात, सध्या कोविड मुळे ही वसतिगृहे बंद असली तरी येणाऱ्या काळात ती गजबजल्यानंतर सर्व वसतिगृहांमध्ये सेंट्रल किचन पद्धतीने भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ना. मुंडे म्हणाले.
No comments