Breaking News

घाटेवाडी येथील शेतकरी आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा चुलत मेव्हण्याचा आरोप

नातेवाईकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे तक्रार

गौतम बचुटे ।  केज 

तालुक्यातील घाटेवाडी येथील एका शेतकऱ्यांने केलेली आत्महत्या ही शेतकरी आत्महत्या नसून त्याने वडील, चुलतभाऊ व इतर नातेवाईकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याने त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे त्यांचे मेव्हणे शिवाजी यादव यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील घाटेवाडी येथील साहेबराव ज्योतिबा ढेंगे यांनी दि. १३ मार्च २०२० रोजी ११:०० वा. सुमारास राहत्या घरात आतून कडी लावून केबल वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी शिवाजी ढेंगे यांच्या खबरी वरून केज पोलीस स्टेशनला फौजदारी प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद गु.र.नं. १५/२०२० प्रमाणे नोंद केली. त्यात क्रूझर गाडीचे कर्ज आणि नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या केली असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्या प्रमाणे पोलीस, तहसीलदार व कृषि अधिकारी यांनी त्रिस्तरीय चौकशी अहवाल सादर केला आणि शेतकरी आत्महत्या योजनेखाली मयत शेतकऱ्यांनाच्या कुटुंबाला १ लाख रु. चे सानुग्रह अनुदान मिळाले आहे.

दरम्यान या आत्मत्येला आता वेगळे वळण मिळाले असून; मयत साहेबराव ढेंगे यांचे चुलत मेव्हणे शिवाजी यादव यांनी दि. १२ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजास्वामी यांना एक निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, साहेबराव ढेंगे याची आत्महत्या ही कर्जबाजारीपणामुळे झालेली नसून ती आत्महत्या ही त्याचे वडील ज्योतीबा ढेंगे, चुलतभाऊ श्रीकृष्ण ढेंगे व बाबासाहेब रोमन यांनी त्याला मानसिक त्रास दिल्यामुळे त्याला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. मयत साहेबराव ढेंगे यांचे दि.११ मार्च २०२० रोजी त्यांचे घरगुती भांडण झाले होते. नंतर तो केज येथे गेला होता. त्या नंतर त्यांचे वडील, चुलतभाऊ व एक नातेवाईक यांनी त्यास केज येथे द्वारका नगरीत घरी जावून त्याला मानसिक त्रास दिला व त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्या त्रासामुळे साहेबराव याने दि. १२ मार्च रोजी आत्महत्या केली. 

या आत्महत्येला वरील त्याचे नातेवाईक हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. मात्र त्यांनी हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून शेतकरी आत्महत्येचा बनाव केला आहे. त्याच्याकडे कोणत्याही बँकेचे थकीत कर्ज नव्हते. या प्रकरणी योग्य तपास करून साहेबराव ढेंगेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या नातेवाईकांच्या विरुद्ध त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भा.दं.वि. ३०६ आणि शासनाची फसवणूक करून शेतकरी आत्महत्या योजनेचा लाभ घेतल्याचा भा.दं.वि. ४२० गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवेदना सोबत त्यांनी पुराव्या दाखल कर्ज नसल्याचे बँकेचे विवरण व मृत्यू पूर्वी फोनवरील संभाषणाची सीडी जोडली आहे. तसेच यामुळे  मयताचे नातेवाईक हे निवेदनामुळे चिडून अर्जदारास त्रास देत असून आत्महत्येची धमकी देत असल्याची तक्रार केली आहे. निवेदनाच्या प्रत उपविभागीय पोलीस अधिकारी केज यांनाही दिली आहे.


No comments