Breaking News

बीड नगर परिषदेने बुजवलेली महेदविया दायरा कब्रस्तान ची विहीर पुनरुज्जीवित करून द्या - जमाअत ए महेदविया कमेटीबीड :  शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या महेदविया दायरा कब्रस्तान ची बीड नगर परिषदेने बुजवलेली विहीर पुनरुज्जीवित करून देण्याची मागणी जमाअत ए महेदविया  कमेटीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

        निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या जमाअत ए महेदविया चे दायरा कब्रस्तान आहे. या कब्रस्तान मध्ये मयत दफन करण्यासाठी तसेच कब्रस्तानात असलेल्या हजरत सय्यद शहा आलम (रह.अलै) यांच्या दर्गाह च्या उरुसानिमित्त दरवर्षी जियारत साठी कब्रस्तानात येणाऱ्या भाविकांसाठी तसेच जवळपास राहणाऱ्या नागरिकांना ही या विहिरीच्या पाण्याचा उपयोग व्हावा, परंतु कब्रस्तानच्या आत विहीर असल्यास महिला आणि मुली आवश्यकता असतानाही कब्रस्तानात येवून विहिरीचे पाणी घेऊ शकणार नाही. हा विचार करून कब्रस्तान ची विहीर जमाअत ए महेदवियाच्या पुर्वजांनी कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीच्या आत न बांधता पश्चिम बाजूच्या भिंती बाहेर मजबूत चिरेबंदी बांधकाम करून  बांधली होती. जेणेकरून विहिरीच्या पाण्याचा लाभ सर्वांना घेता यावा. या विहिरीच्या पाण्याद्वारे सर्वांची सोय होत असे. परंतु बीड नगर परिषदेने कब्रस्तानालगत असलेल्या बिंदुसरा नदीपात्रातून जेव्हा अशोक नगर व ढगे कॉलनी साठी मोमीनपुरा बायपास हा रस्ता निर्माण केला, तेव्हा बीड नगर परिषदेच्या तत्कालीन यंत्रणेने किंबहुना बीड नगरपरिषदेनेच जमाअत ए महेदविया ला कोणतीही कल्पना न देता परस्पर दायरा कब्रस्तान ची विहीर बुजवून टाकली. 

बीड नगर परिषदेने रस्ता निर्माण केल्यानंतर दायरा कब्रस्तान च्या विहिरीची दखल घेतली नाही की, रस्ता निर्माणावेळी आणून विहिरीत टाकलेले दगड-गोटे, माती, मुरूम असे कच्चे मटेरिअल तेव्हापासून आजपर्यंत ही विहीरीतून काढून विहीर खुली करून देण्याचे सौजन्य बीड नगर परिषदेने दाखवले नाही की, विहीर साठी कोणते कार्य ही केले नाही. यामुळे अनेक वर्षांपासून जमाअत ए महेदवियाची मयत दफन करताना तसेच कब्रस्तान मध्ये असलेल्या हजरत सय्यद शहा आलम (रह.अलै) यांच्या दर्गाच्या उरुसासाठी आणि दर गुरुवारी व शुक्रवारी कब्रस्तान मध्ये येणाऱ्या भाविकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याविना  गैरसोय होत आहे. म्हणून दायरा कब्रस्तान ची विहीर पुनरुज्जीवित करून देण्याचे काम जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी अर्थातच जिल्हाधिकारी या नात्याने  या प्रकरणात लक्ष घालून  लवकरात लवकर जमाअत ए महेदविया दायरा कब्रस्तान ची बीड नगर परिषदेने बुजवलेली विहीर पुनरुज्जीवित करून द्यावी किंवा विहीर पुनरुज्जीवित करून देण्याचे आदेश बीड नगर परिषदेला द्यावे. अशी मागणी जमाअत ए महेदविया कमेटी ने  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली असून निवेदनावर कमेटी चे अध्यक्ष मुहम्मद अब्दुल सत्तार, उपाध्यक्ष मुहम्मद इसाक़, कार्याध्यक्ष एस.एम.युसूफ आणि शेख फैज़ मुहम्मद, शेख अखील मुहम्मद, शेख खालेद, शेख नदीम, शेख वासेख आदींची नावे व सह्या आहेत.

No comments