Breaking News

माजलगावचे बनावट नोटांचे रॅकेट परभणीत उघड?


पोलिसांनी पाच जणांना केले अटक

बाळासाहेब आडागळे । माजलगाव

कापूस विक्रीच्या काळात सर्रास बनावट नोटांचा सुळसुळाट होतो, असाच प्रकार आता ही सुरू आहे. त्याचा प्रत्येय मंगळवारी दिसून आला असून शहरातील पाच जणांना परभणी पोलीसांनी बनावट नोटाच्या तस्करी प्रकरणी ताब्यात घेतले आहे. विशेष त्यात एक आरोपी १४ वर्षीय आहे. यामुळे माजलगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून जो-तो स्वतःच्या नोटाकडे संशयाच्या नजरेने पाहु लागला आहे.

  पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी पोलिसांच्या विशेष पथकाने वडगाव सुक्रे (जि.परभणी) येथे २०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगणार्‍या सय्यद फिरोज सय्यद मोहम्मद (वय ३२), मारुती अशोक सोळंके (वय ३५) रा.माजलगाव जि.बीड यांना सोमवारी ताब्यात घेवून चौकशी केली. यात त्यानी माजलगाव येथील आणखी तिघेजण साथीदार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावर परभणी पोलिसांनी रात्रीतून माजलगाव शहर गाठले. माजलगाव शहर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी पहाटे शहरातील फुलेनगर भागातून भागवत रामभाऊ शिंदे (वय ३०) व आणखी दोघे अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाईत परभणी पोलिसांच्या विशेष पथकाने आरोपीकडून दोनशे रुपयांच्या ४८ नोटा जप्त केल्या असल्याची माहिती आहे. परभणी पोलीसांच्या या कार्यवाहीमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही कार्यवाही विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक विश्वास खोले यांच्यासह चंद्रकांत पवार, राहुल चिंचाणे, सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, दिपक मुदीराज, विष्णू भिसे, धरणे आदीसह माजलगाव शहराचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.भास्कर राउत, व्ही.एच.अंकुशे यांनी पार पाडली.

पुण्यातून कोण चालवतो बनावट नोटांचे रॅकेट

दोनशे रुपयाच्या बनावट नोटा मार्केटमध्ये आनणारा मुख्य सूत्रधार पुणे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात अनेक शहरात आपले एजंट निर्माण करून बनावट नोटांचे रॅकेट चालवले जाते. विशेष या नोटा कापुस खरेदी करणार्‍यां व्यापार्‍यांना ५० टक्याने पुरवल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. ह्याच बनावट नोटा कापूस विक्री करणार्या शेतकर्‍यांच्या माथी मारल्या जात आहेत.

लहान मुलांचा केला जातो वापर

बनावट नोटा बाजार पेठेत पसरवण्यासाठी प्रयोग म्हणून लहान मुलांचा प्रथम वापर केला जातो. यानंतर नागरिकांतून बनावट नोटा संदर्भात काय प्रतिक्रिया येते हे पाहितले जाते. यावर बनावट नोटा बाजार पेठेत आणल्या जातात.

नोटावरील ह्या सिरीज आहेत बनावट

सध्या समोर आलेल्या बनावट नोटामध्ये दोन सिरीज आहेत. त्यात ६ एचडी आणि ७ एच.डी. या सिरीजच्या बनावट नोटा असल्याचे सांगण्यात येत आहे. खर्‍या नोटांना कुठलीही सिरीज नसल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.


No comments