Breaking News

पत्नीच्या खून प्रकरणी नवऱ्याला जन्मठेप : बीड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल


गौतम बचुटे । बीड 

हुंड्यासाठी बायकोचा छळ करून तिला फास देऊन खून केल्या प्रकरणी गेवराई तालुक्यतील गुळज येथील घटनेत त्या अभागी विवाहितेच्या नवऱ्याला दोषी ठरवून त्याला जन्मठेसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या बाबतची माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील खळेगाव अंतर्गत दादेगाव येथील शेख रशीद शेख अब्दुल यांची मुलगी समीना हिचा विवाह मुस्लिम धर्मीय रितिरिवा प्रमाणे सन २०१० मध्ये गुळज येथील याकूब शेख यांचा मुलगा अस्लम शेख यांच्या सोबत झाला. लग्ना नंतर दोन वर्षे समिना हिला तिच्या सासरच्या लोकांनी नांदवले. मात्र त्या नंतर तिला मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागले. या बाबत समिना ही माहेरी आल्या नंतर हा सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगत असे. मात्र या बाबत तिचे आई वडील हे तिची समज काढून तिला सासरी नांदायला पाठवित. या दरम्यान तिला चार अपत्ये झाली. 

समिना हिला तिच्या सासरच्या लोकांनी घर बांधकामासाठी माहेरहून तुझ्या आई-वडीलां कडून दोन लाख रु. घेऊन ये; म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. दरम्यान दि. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी समिनाच्या वडिलांनाफोन वरून कळविले की समिना आजारी असून ती बोलत नाही. माहिती मिळताच तिचे आई-वडील हे गुळज येथे गेले असता; समिना ही मयत झाल्याचे आढळून आले. तसेच तिला मारहाण करून व तिच्या गळ्यावर गळा कशाने तरी आवळून तिचा खून केल्याचे निदर्शनास आले. 

या प्रकरणी मयत समिनाचे वडील शेख रशीद यांनी गेवराई पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार अस्लम याकुब शेख, सलाम याकुब शेख, आसीफ याकुब शेख, याकुब बनेमिया शेख आणि कलीमुन्नीसा ऊर्फ कलीमा याकुब शेख याच्या विरूध्द गु. र. नं. २३५/२०१७ भा. दं. वि. ३०२, ४९८ (अ), ३२३, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास तात्कालिन पोलीस उपनिरीक्षक एन. एम. शेख यांनी केला. तपासी अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोप दाखल केले.

या प्रकरणांची सुनावणी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्या न्यायालयात होऊन दि. १५ डिसेंबर २०२० रोजी अंतीम न्यायनिर्णय पारीत करण्यात आला. न्यायालयाने मयत समिनाचा नवरा आरोपी अस्लाम शेख यास भा.दं.वि. ३०२ अंतर्गत दोषी धरून आजन्म कारावास व  २५०००/- रु. दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.  इतर आरोपीतास मा. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील बी. एस. राख यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज सहायक फौजदर सी. एस. इंगळे यांनी त्यांना मदत केली.

No comments