Breaking News

स्वच्छता कर्मचारीही कोरोना योद्धयांना लस द्या


जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
: संभाजी ब्रिगेड पालिका कर्मचारी संघटना आक्रमक

बीड : कोरोनाच्या लढ्यात स्वच्छता करून सामान्यांचे आरोग्य सदृढ ठेवण्यात नगर पालिका व पंचायतचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत होते. ते सुद्धा कोरोना योद्धा आहेत. जसे आरोग्य विभागाला कोरोना लस दिली जात आहे, त्याच धर्तीवर स्वच्छता कर्मचाऱ्यांनाह द्यावी, अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेड कर्मचारी संघटना आक्रमक झाली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.
जिल्ह्यात बीडसह परळी, माजलगाव, अंबाजोगाई, धारूर, गेवरोई येथे नगर पालिका तर आष्टी, शिरूर, पाटोदा, केज, वडवणी येथे नगर पंचायत आहेत. या ठिकाणी हजारो कर्मचारी स्वच्छता विभागात कर्तव्य बजावतात. कोरोनाकाळात आरोग्य विभागाप्रमाणेच स्वच्छतेसाठी पालिका कर्मचाऱ्यांनीही जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावलेले आहे. हे करताना अनेकांना कोरोनाची लागणही झाली होती. त्यामुळे शासनाने जसे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला, तसाच आता स्वच्छता कर्मचाऱ्यांबाबतही घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष सुनील काळकुटे, कार्याध्यक्ष अमोल शिंदे, शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत बागलाने व उपाध्यक्ष मनोज कवडे, महादेव गायकवाड आदींची उपस्थिती होती.
▅    कोरोनाकाळात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत जनतेचे आरोग्य सदृढ ठेवले आहे. त्यामुळे हे पण कोरोना योद्धे आहेत. आरोग्य विभागाप्रमाणेच या कर्मचाऱ्यांनाही कोरोना लस द्यावी.
सुनिल काळकुटे
जिल्हा उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड पालिका कर्मचारी संघटना बीड



No comments