Breaking News

बिबट्याला जेरबंद नाहीतर ठार मारा आ.सुरेश धस यांची मुख्य वन संरक्षक अधिकारी यांच्याकडे मागणी


के. के. निकाळजे । आष्टी 

तालुक्यासह काही भागात नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच काहींना जखमीही या नरभक्षक बिबट्याने केलेले असल्याने हा बिबट्या पुन्हा मानवी जीवितावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वन्य जीव (संरक्षण ) अधिनियम १९७२ चे कलम ११(१)(क) नुसार मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या अनुसूची - १ मधील वन्य प्राण्यास जेल बंद करणे,बेशुद्ध करणे अथवा ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी मुख्य वन संरक्षक अधिकारी मुख्य कार्यालय नागपूर यांच्यासह मुख्य वनसंरक्षक कार्यालय औरंगाबाद तसेच विभागीय वन अधिकारी बीड यांच्याकडे पञाद्वारे केली आहे.

       

दिलेल्या पञात आ.धस यांनी म्हटले आहे की,गेल्या काही दिवसापासून आष्टी तालुक्यातील नागनाथ गहिनीनाथ गर्जे रा. सुरुडी,स्वराज सुनील भापकर रा भापकरवाडी ता. श्रीगोंदा (घटना स्थळ किन्ही ता. आष्टी), सुरेखा नीळकंठ बळे रा. पारगाव जोगेश्वरी या तीन व्यक्तींचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे.तर शालन शहाजी भोसले, विजय भोसले, शिलावती दत्तात्रय दिंडे आणि अभिषेक दत्तात्रय दिंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या शेतामध्ये तुर, कापूस, ज्वारी ही पिके उभी असून त्यांना पाणी देणे, औषध फवारणी करणे, खुरपणी करणे तसेच राखणी करणे ही कामे करणे शेतक-यांना अपरिहार्य असून शेतकरी, शेत मजुरांना सतत शेतात जावे लागत आहे.

तथापी,बिबट्याचा वावर वाढला असून त्यांच्या प्राणघातक हल्ल्याच्या धास्तीने जनता भयभीत झालेली आहे.नागरिक दहशतीखाली वावरत आहे वनविभागाकडून संरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.परंतु वन्य जीव (संरक्षण ) अधिनियम १९७२ चे कलम ११(१)(क) नुसार मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या अनुसूची - १ मधील वन्य प्राण्यास जेल बंद करणे / बेशुद्ध करणे / ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यक्ताआहे.

 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ११(१)(क) नुसार परवानगी देणे ही एक वैधानिक बाब असल्याने अत्यंत काळजीपूर्वक तसेच मा. उच्च न्यायालय यांचे निर्देशानुसार आपल्या विभागामार्फत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा आणि आष्टी मतदारसंघातील बिबट्यांच्या धास्तीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा मिळेल यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असेही या पञात म्हटले आहे.


No comments