Breaking News

सुनेला आत्महत्येस केलं प्रवृत्त : सासूला दोन तर नवऱ्याला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

बीड :  सुनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मानसिक व शाररिक त्रास देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासूला दोन हजार रुपये दंड व दोन वर्षे सश्रम कारावास तर नवऱ्याला एक वर्ष सश्रम कारावासासह एक हजार रुपये दंडाची शिक्षा माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी ठोठावली आहे. 

अधिक माहिती अशी : यातील फिर्यादी शिवाजी मारोती सोळंके यांनी फिर्याद दाखल केली होती, की माझी मुलगी नामे कोमल हिचे लग्न माजलागाव येथील हनुमंत नारायण सिरसट यांच्या सोबत दोन वर्षांपूर्वी झाले होते. १६ सप्टेंबर २०१५ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मला माझे मालक गौतम सोळंके यांनी मला फोन करुन कळविले की, तुमची मुलगी कोमल ही जास्त भाजल्याने तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे. असं कळल्यानंतर अंबाजोगाई येथे गेलो व मुलीस पाहिले. तिला विचारल्यावर तिने सांगितले की, तिची सासू शकुंतला नारायण सिरसट ही तिच्या चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ करत होती. नेहमीप्रमाणे आज ही सासू शकुंतला हिने अतिरेक केल्याने रागाच्या भरात मी घरात असलेला रॉकेलचा कॅन अंगावर ओतून घेवून स्वतः ला पेटवून घेतले.


घडलेल्या प्रकरणाबाबत विवाहितेचे वडील यांनी तिची सासू शकुंतला नारायण सिरसट, पती हनुमान नारायण सिरसट, सासरा नारायण केशव सिरसट (सर्व रा. मठ गल्ली, माजलाग) यांच्या विरुद्ध माजलगाव शहर पोलिस ठाण्यात जवाब दिल्यानुसार गु.र. नं. १०३/२०१५ कलम २०५, ५०४, ४९८(३४) अ भादवी प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणाचा तपास सपोनि एस. एस. देवकर यांनी करुन आरोपी विरुद्ध सबळ पुराव्या आधारे अंतिम दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले. न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपी सासू शकुंतल व कोमलचा पती हनुमान सिरसट  यांच्या विरुद्ध सबळ पुरावा दिसून आल्याने न्यायालयाने आरोपीस दोषसिद्ध ठरविले. आरोपी सासू शकुंतला हिला दोन हजार रुपये दंड आणि दोन वर्षे सश्रम कारावास तर कोमलचा पती हनुमान याला एक हजार रुपये दंडासह एक वर्ष सश्रम करावासाची शिक्षा सुनावली तर आरोपी सासरा नारायण सिरसट यास निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू ऍड. रणजित वाघमारे, ऍड. अजय तांदळे यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोहेकॉ जे. एस. वावळकर यांनी पाहिले. No comments