Breaking News

कौन बनेगा करोडपती विजेत्या लक्ष्मीताई पारखे यांचा रामलिंग पतसंस्थेकडून गौरव


लक्ष्मीताईंमुळे वडवणी व कोष्टी समाजाचे नाव देशाच्या धवलपटावर गाजले - कचरुसेठ झाडे 

जगदीश गोरे । वडवणी

मूळच्या वडवणी येथील रहिवासी असलेल्या व सध्या नोकरीनिमित्त भूम जि.उस्मानाबाद या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सौ.लक्ष्मीताई ज्ञानेश्वर पारखे (कवडे) यांना नुकतीच सोनी चॅनलवरील जगप्रसिध्द शो असलेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या संधीचं त्यांनी आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर सोने करीत या शोतून तब्बल १२ लक्ष ५० हजार रुपये एवढी धनराशी जिंकत त्या विजेत्या ठरल्या आहेत. दरम्यान सौ.लक्ष्मीताई यांच्यामुळेच वडवणी शहराचे व कोष्टी समाजाचे नाव देशाच्या व जगाच्या धवलपटावर नावाजले तसेच गाजले आहे. असे अभिमानास्पद उदगार चेअरमन कचरुसेठ झाडे यांनी रामलिंग पतसंस्थेच्या वतीने गौरव सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केले. 

                

मूळच्या वडवणी जि.बीड येथील रहिवासी असलेल्या सौ.लक्ष्मीताई ज्ञानेश्वर पारखे माहेरचे नाव लक्ष्मीताई अंकुशराव कवडे या येथील रहिवासी आहेत. मात्र नोकरीनिमित्त त्या सध्या भूम जि.उस्मानाबाद या ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सौ.लक्ष्मीताई पारखे या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कसबा पेठ भूम याठिकाणी सेवक पदावर कार्यरत असून त्यांना शिक्षणाची व नवीन नवीन गोष्टी ज्ञानार्जित करण्याची प्रचंड आवड आहे. त्यांनी खूप वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केलेली आहे. त्यामुळे त्यांची शिक्षणाविषयी असलेली आवड त्यांच्या बुध्दिमत्तेला चालना देणारी ठरली आहे. या बळावरच त्यांनी सोनी टीव्ही चॅनलवरील जगप्रसिध्द असा कार्यक्रम शो असलेल्या व महानायक अमिताभ बच्चन यांच्या संचालनाखाली प्रसारित होणाऱ्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नाला यश आले व कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी होऊन महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोरील हॉट सीटवर बसण्याची संधी त्यांना मिळाली. 

या कार्यक्रमात त्यांनी अनेक कठीण प्रश्नांना धैर्याने सामोरे जात आपल्या इच्छा अपेक्षा मनोकामना स्वप्नांची मांडणी महानायक बच्चन यांच्यासमोर करत प्रश्नांची योग्य व विचारपूर्वक अचूक अशी उत्तरे दिली. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या बुध्दिमत्तेच्या बळावर जवळपास १२ लक्ष ५० हजार रुपये एवढी धनराशी जिंकत महिला वर्गात एक आदर्श निर्माण केला आहे. नुकतेच दिनांक १८ व १९ नोव्हेंबर २०२० रोजी संपूर्ण जगभरात सोनी चॅनलवर त्यांचा हा एपिसोड प्रसारीत करण्यात आला होता. स्त्रीने जर स्वतःच्या मनात जिद्द व अथक परिश्रमातून कोणतेही ध्येय उराशी बाळगले तर ते साध्य करण्यासाठी निश्चितपणे सर्व बाजूने सकारात्मक ताकद मिळते ऊर्जा मिळते व त्यानंतर शेवटी यशही निश्चितपणे लाभतेच. महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोरील हॉट सीटवर बसून त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलण्याची व गप्पा मारण्याची दैवी संधी मला लाभली हे मी माझे नशीबच समजते. कोणतीही स्त्री कोणत्याच गोष्टीत कमी नसते. परंतु तिने दृढनिश्चयी असायला हवे. तिने जर मनात ठरवले तर अशक्य असे काहीच नाही असाही अनमोल संदेश यावेळी सत्कारानंतर सौ.लक्ष्मीताई पारखे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विजयी ठरल्यानंतर सौ.लक्ष्मीताई पारखे यांचा लागलीच मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात नामांकित असलेल्या रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ता.वडवणी यांच्यावतीने गौरव सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव डिगे, चेअरमन कचरुसेठ झाडे, सर्वश्री संचालक नवनाथराव म्हेत्रे, अरुणराव गुरसाळी, व्यवस्थापक दिगांबर गुरसाळी, दत्तात्रय पारखे, रामेश्वर पारखे, वैभव पारखे, ईश्वर ढवळशंक, राहूल बागडे, अविनाश वाव्हळ, सचिन म्हेत्रे, लखन टिकुळे, नारायणराव गुरसाळी व इतर उपस्थित होते. दरम्यान सौ.लक्ष्मीताई यांच्यामुळेच वडवणी शहराचे व कोष्टी समाजाचे नाव देशाच्या व जगाच्या धवलपटावर नावाजले तसेच गाजले आहे. त्यांचे यासाठी शुभेच्छा अभिनंदन व आभार असे अभिमानास्पद उदगार चेअरमन कचरुसेठ झाडे यांनी रामलिंग पतसंस्थेच्या वतीने गौरव सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार व्यवस्थापक दिगांबर गुरसाळी यांनी मानले.


No comments