Breaking News

सोनीजवळ्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण


वीजचोरी रोखण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात मारले फ्युज फेकून

गौतम बचुटे । केज 

वीज चोरी रोखण्यास गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास सोनीजवळा येथील कोकाटे वस्तीवरील शेतकऱ्यांने डोक्यात डीपीतील फ्यूज फेकून मारल्याने विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना शनिवारी सकाळी ११:०० वा. च्या सुमारास घडली आहे. जखमी कर्मचाऱ्यास उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती केज येथील विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली आहे. केज येथील विद्युत वितरण कंपनीच्या सहा विभागातील ११ केव्ही लाईन वरील डीपी सतत जळू लागल्याने केज उपविभागा मार्फत दर शनिवारी ११ केव्ही लाईनची देखभाल व त्या लाईन वरील डीपीची पाहणी करण्यात येत आहे. 

या डीपीवर अनाधिकृतपणे आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकृत वीज जोडणी घ्यावी. यासाठी त्यांच्याकडून कागदपत्रे सादर करून घेतली जातात. शनिवारी केज तालुक्यातील सोनीजवळा येथे वीज वाहिनी व डीपी वरील अनधिकृत आकडे काढण्यास विद्युत वितरण कंपनीचे सात जणांचे पथक गेले होते. या पथकाने सोनीजवळा येथील भवानी नगर वरील गावठाण डीपीवरील आकडे व वायर काढल्या नंतर हे पथक सोनीजवळा येथील कोकाटे वस्तीवरील ११ केव्हीच्या वीज वाहिनीची व तेथील डीपीची पाहणी करण्यास गेले असता. त्यांना डीपीतुन आकडे टाकून वीज चोरी केली जात असल्याचे दिसून आल्यामूळे त्यांनी डीपीतील वायर काढले. 

याचा राग आल्याने कोकाटे वस्तीवरील सुधीर कोकाटे एका शेतकऱ्याने पथकातील वीज कर्मचाऱ्यास डीपीतील फ्यूज डोक्यात फेकून मारल्याने केज येथील शाखा ग्रामीणचे वीज कर्मचारी दयानंद कावळे हा गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरील कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती केज येथील विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली आहे.या प्रकरणी जखमी कर्मचाऱ्याच्या फिर्यादी वरून युसुफवडगाव पोलीस स्टेशनला शासकीय कामात आणल्याचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे.


No comments