Breaking News

छत्रपती राजर्षी शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन


बीड :
 मराठवाड्यातील बँकिंग क्षेत्रात अग्रणी असलेल्या छत्रपती राजर्षी शाहू नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील यांचे गुरुवारी (दि.26) पहाटे 1.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्षे होते.


सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अर्जुनराव जाहेर पाटील यांनी स्वकर्तुत्वाने उद्योग, बँकिंग, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून अभियंता पदवी प्राप्त केल्यानंतर शासकीय सेवेची संधी असतानाही त्यांनी स्वतंत्रपणे उद्योगी जीवनाचा प्रारंभ केला. औरंगाबाद येथील प्रख्यात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीवरही त्यांची निवड झाली होती. बीड येथील बलभीम महाविद्यालय आणि विधी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, मराठवाडा चेम्बरचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबरचे ते संचालक होते. जाहेर पाटील कुटुंबियांच्या दु:खात दृष्टीकोन परिवार सहभागी आहे.

सहकार क्षेत्राची मोठी
हानी-ना.धनंजय मुंडे
बीड येथील छत्रपती शाहू नागरी सहकारी बँकेचे संस्थापक, उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील उमदे
व्यक्तिमत्त्व हरपले-पंकजाताई मुंडे  

छत्रपती राजर्षि शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जूनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  जाहेर पाटील यांच्या निधनाची वार्ता समजली, अतीव दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.


शिक्षण, बँकिंग क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्व गमावले-जयदत्त अण्णा

औद्योगिक क्षेत्राची प्रगती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि तरुणांना उद्योजकांना योग्य मार्गदर्शन करून औद्योगिक क्षेत्रासाठी सक्रिय राहून बँकिंग क्षेत्रात विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून अर्जुनराव जाहेर पाटील होते बँकिंग क्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रातील  तसेच शिक्षण क्षेत्रातील एक नेतृत्व गमावले असल्याची भावना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.

No comments