Breaking News

पदवीधरांच्या न्याय्य हक्कासाठी माझा लढा- रमेश पोकळे


विद्यमान आमदारांचे शिक्षणाऐवजी टक्केवारीवर लक्ष

उस्मानाबाद :  मराठवाड्यातील बेरोजगारांचे आणि पदवीधरांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. शिक्षण क्षेत्र आणि पदवीधरांच्या न्याय्य हक्कासाठी 22 वर्षापासुन माझा लढा सुरू आहे. या लढ्याला मुहूर्तरूप देण्यासाठी पदवीधर मतदारांनी मला निवडणुन द्यावे असे आवाहन करत विद्यमान आमदारांनी मराठवाड्याच्या शैक्षणीक गुणवत्तेवर लक्ष देण्याऐवजी गुत्तेदारीच्या टक्केवारीवर लक्ष दिले असल्याचा घणाघात रमेश पोकळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

उस्मानाबाद येथे मराठवाडा शिक्षक संघ व संभाजी सेना महाराष्ट्र चे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे प्रचारा निमित्त आले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेत पोकळे यांनी राष्ट्रवादी आणि भाजपा उमेदवारांना आमदारकी केवळ उद्योगाच्या संरक्षणासाठी हवी आहे. मावळत्या आमदारांनी बारा वर्षात काय दिवा लावला? असा खडा सवाल उपस्थित केला. पोकळे म्हणाले की, सरकारच्या दिशाहीन धोरणामुळे दिवसेंदिवस पदवीधरांचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत ते सोडवण्यासाठी मला संधी द्यावी. मावळत्या आमदारांनी मराठवाड्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विधीमंडळात न बोलता शैक्षणीक संस्थांना राजकीय अड्डा बनवण्याचे काम केले.

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला शिक्षण क्षेत्राची जाण नाही, प्रश्न माहिती नाही, त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात योगदान काय? दोन्ही पक्षाचे उमेदवार घोटाळा खोर आहेत त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. मी भाजपा नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सहवासात वाढलेला सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाकडे माझे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन मी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यात कोणते निकष लावले हे मात्र कळत नाही. माझी उमेदवारी मी पदवीधरांच्या आग्रहास्तव आणि मतदारांच्या पाठबळावर निश्चित केली आहे. असे स्पष्ट केले.

संपूर्ण मराठवाड्यात आपल्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत असून,विविध राजकीय पक्षातील नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याचा हात पुढे येत आहे. मराठवाड्यातील हजारो अदृश्य हात माझ्या विजयासाठी प्राचारात सक्रिय आहेत. त्यामुळे दोन्ही राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकु लागली आहे. माझ्या उमेदवारीला माझे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन मराठवाडा शिक्षक संघाने आणि संभाजी सेना महाराष्ट्र यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्यामुळे, मी या निवडणुकीत निश्चितपणे विजय होणार असल्याचा विश्वासही पोकळे यांनी व्यक्त केला. यावेळी मरावाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस व्ही.जी.पवार,बीड जिल्हा सचिव राजकुमार कदम,बाळकृष्ण थापडे उपस्थित होते.

No comments