Breaking News

सचिन कांबळेला उच्च शिक्षणासाठी बीड जिल्हा मुप्टा व बामसेफने केली आर्थिक मदतबीड :   राष्ट्रीय, राज्य, सामाजिक व व्यक्तिशः पातळीवर  जेव्हा जेव्हा आपत्कालीन संकट निर्माण होतात तेव्हा तेव्हा बीड जिल्ह्याच्या मुप्टा व बामसेफ सामाजिक संघटनांनी आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात पुढे केलेला आहे. सद्यस्थितीत कोरोना संकट काळातही मदत करण्यास बीड जिल्हा मुप्टा व बामसेफ मागे सरले नाहीत. 

त्यातच सचिन बाबुराव कांबळे रा. खडकी (देवळा) ता. वडवणी जि. बीड या युवकाची मेलबोर्न विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया येथे उच्चशिक्षणासाठी निवड झाली, परंतु घरची आर्थिक परिस्थिती  जेमतेम असल्याने हा युवक उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकत नाही, हे समजतात बीड जिल्हा मुप्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांना समजले व त्यांनी आपल्या मुप्टा व बामसेफ संघटना पदाधिकारी व सदस्यांना याबाबत सूचित करून आर्थिक मदतीचे आव्हान केले असता केवळ दोन दिवसात सर्वांच्या वतीने 50 हजार रुपये जमा करून आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी सदिच्छा स्वीकारताना सचिन कांबळे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की,आज पर्यंत शिक्षण घेताना मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून शिक्षण घेत आलो आहे. ही माझी व्यक्तिशः प्रगती नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मेहनतीचे फलित आहे.खरेतर महापुरुषांच्या कर्तृत्वामुळे आमचे जीवन सुखकारक होत आहे. त्यांच्या कर्तृत्वाची जाण ठेवून माझे कार्य मी पूर्णत्वास नेईल अशी ग्वाही दिली. यावेळी मा. प्रा.रोडे  म्हणाले की, वेळेअभावी केलेल्या मोठ्यात मोठ्या मदतीपेक्षा वेळेत केलेली मदत ही केव्हाही मोठी असते. एका मजुरी करणाऱ्या कुटुंबातील हा युवक उच्च शिक्षणासाठी मेलबोर्न विद्यापीठात ऑस्ट्रेलिया येथे जात आहे याचा बीड जिल्ह्याचा पुत्र म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. आज सचिन ज्या परिस्थितीतून पुढे जात आहे असे अनेक सचिन या समाजात परिस्थितीने पुढे जाण्यास रोखलेले आहेत, तेव्हा सचिन उच्चशिक्षण घेऊन परतून आल्यावर त्याच्या हातून गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी व त्याचे कार्य समाज उपयोगी यावे अशी अपेक्षा व्यक्त करून विदेशी उच्च शिक्षणासाठी जाण्यास सदिच्छा दिल्या. यावेळी सदिच्छा देण्याकरिता प्रा. प्रदीप रोडे, प्रा.राम गायकवाड, प्रा. डॉ. प्रेमचंद सिरसट,प्रा. डॉ.उत्तम साळवे, प्रा. शशिकांत गायकवाड,आयु. अंकुश निर्मळ ,डॉ. डी. जी. वानखेडे, पत्रकार अनिल वाघमारे, प्राचार्य राऊत डी.डी. प्रा. अर्जुन राठोड. सह आदी उपस्थित होते.


No comments