Breaking News

मांजरीची पाचवी सुद्दा न सोडणाऱ्या नेत्यांना साळेगावच्या पीडित कुटुंबाचे अश्रू पुसायला सवड मिळेना ?गौतम बचुटे । केज

तालुक्यातील साळेगाव येथे दस्तगिराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेता जवळ सकाळी ८:३० ते ९:०० वा. दरम्यान शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या अश्विनी समाधान इंगळे वय वर्षे २४ या विवाहित महिलेवर पंकज भगवान जाधव व धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे या दोन नराधम नीच श्वापदांनी सामूहिक बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केला. मेल्या नंतरही डोक्यात दगडाचे घाव घातले. तिचे प्रेत नग्नावस्थेत फेकून दिले. मरणा नंतरही तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले. सर्व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात दोघा विरुद्ध सामुहिक बलात्कार करून खून केल्याच्या आरोपाखाली गु.र.नं. ४५३/२०२० भा.दं.वि. ३०२, ३७६ (ड) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपी अटक केले आहेत.

एवढी माणुसकीला लाजिरवाणी घटना घडली असतानाही; एका स्त्रीची नव्हे तर कुणाची माता; कुणाची भगिनी; कुणाची मुलगी तर कुणाची पत्नी हिला एवढे हाल करून व मरणानंतरही तिच्या नातेवाईकांना समाजात तोंड दाखवता येऊ नये. अशी पूर्व नियोजित पद्धतीने कट करून ठार मारले जाते; तरी अद्याप पर्यंत या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी एकही माईचा लाल कुणी पुढे आला नाही. 

एरवी प्रसिद्धीसाठी आणि नावासाठी हपापलेले नेते एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीने गाडी घेतली तर त्याच्या पूजेला धावत जातात. कुत्र्याचा वाढदिवस असला तरी त्याला आणि त्याच्या मालकाला शुभेच्छा द्यायला रांग लावतात. त्यांच्या घरातील अगदी स्वतःचे नाक न पुसता येणाऱ्या दिवट्यांचे अभिष्टचिंतन करतात. एवढेच नव्हे तर एखाद्याच्या घरात मांजर व्याली तर तिच्या पिल्लांची पाचवी सुद्धा सोडीत नाहीत! मात्र बीड जिल्ह्यातील साळेगाव ता. केज येथील अभागी भगीनीच्या इज्जतीचे लचके तोडून तिला ठार मारले तरी त्या नराधम श्वापदांची कामवासना शमली जात नाही. त्या पीडितेच्या कुटुंबाची काय अवस्था असेल? तिची अल्पवयीन मुलांची काय मानसिकता असेल? या विषयी त्यांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जिल्ह्यातील एकाही पुढाऱ्याला वेळ मिळत नाही. हे तमाम स्त्री जन्माचे दुर्दैवच म्हणावे लागेल!No comments