Breaking News

नरभक्षक बिबट्याने घेतला बालकाचा बळी प्रशासनाने आधी बिबट्याचा बंदोबस्त करावा संतप्त नागरिकांची मागणी

आष्टी :  तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढू लागली असून या परिसरातील नागरिकांवर बिबट्या सातत्याने हल्ले करू लागला आहे. दोन दिवसापूर्वी पंचायत समिती सदस्य पतीला ठार केल्यानंतर काल शिरूर तालुक्यातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. शुक्रवारी दुपारी या बिबट्याने एका नऊ वर्षीय मुलाला उचलून नेल्याचा प्रकार किन्ही येथे समोर आला.त्यानंतर काही वेळातच बिबट्याने लचके तोडलेला मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. 

आष्टी तालुक्यातील बिबट्याने दोन निष्पाप जिवांचा बळी घेतला असुन परिसरातील नागरीकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने आधी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. आष्टी तालुक्यातील किन्ही येथे स्वराज सुनिल भापकर (वय 9) या मुलाला आजी आजोबा देखत बिबट्याने उचलुन नेले. त्यानंतर काही वेळातच घराशेजारील शेतात बिबट्याने लचके तोडलेल्या मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली. स्वराज भापकर हा भापकरवाडी (ता.श्रीगोंदा) येथील असुन दिवाळी निमित्त तो किन्ही येथे आजीच्या गावी आला होता. काल दुपारी तो घराशेजारीच असलेल्या शेतामध्ये अन्य नागरीकांसोबत गेला होता. त्याचे नातेवाईक तुरीला पाणी देत असतांना बिबट्याने अचानक मुलावर झडप घातली आणि त्याला तोंडात पकडुन नेले. यानंतर काही वेळातच स्वराजचा लचके तोडलेला मृतदेह आढळुन आला. बाजुला खेळत असलेला नातु क्षणात बिबट्याचा शिकार झाल्याचे पाहुन आजीसह अन्य नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असुन वनविभागाचे पथकही दाखल झाले आहे. दरम्यान प्रशासनाने आधी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. बिबट्याच्या दहशतीने आष्टी तालुक्यातच नव्हे तर पाटोदा आणि शिरूर तालुक्यातही नागरीकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. 


No comments