Breaking News

परळीत उद्या सतीश चव्हाणांच्या प्रचारार्थ सहविचार सभा व पदवीधर मेळाव्याचे आयोजन



परळी  : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीस आता सुरुवात झाली असून, परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. संजय दौंड यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा व पदवीधर मेळाव्याचे बुधवारी (दि. ११) आयोजन केले आहे.

आ. चव्हाण यांची ही तिसरी निवडणूक असून, त्यांच्या विजयी हॅट्ट्रिक मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी व्यक्त केला आहे.  त्याअनुषंगाने दि. ११ नोव्हेम्बर बुधवार रोजी परळी येथील हालगे गार्डन मंगल कार्यालय येथे दुपारी २.३० वा सहविचार सभा व पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्यास यशस्वी करण्याचे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी लीलावती रुग्णालयातून केले असून, मेळाव्यास आ. संजय दौंड, आ. सतीश चव्हाण यांसह महाविकास आघाडी व मित्रपक्षातील नेतेगण संबोधित करणार असून, परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जि. प.सदस्य, पं. स.सदस्य, नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख, डॉक्टर्स, वकील, शिक्षक तसेच पदवीधर बंधू भगिनींनी कोविड विषयक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन परळी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करा - धनंजय मुंडे यांचे रुग्णालयातून आवाहन

सहविचार सभा व या मेळाव्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित करणे अपेक्षित होते, मात्र ना. मुंडे हे तीव्र पोटदुखीने त्रस्त असून मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पदवीधर मेळाव्यास जास्तीत जास्त ताकतीने व संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावे, महा विकास आघाडीची व आ. सतीश भाऊ चव्हाण यांची ताकत वाढवावी, असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.



No comments