Breaking News

ऊसतोड कामगारांसाठी सुरेश धस यांनी उभारलेला लढा हा कौतुकास्पद- माजीमंत्री बबनराव ढाकणे


के. के. निकाळजे । आष्टी

ऊसतोड कामगारांसाठी ज्यांनी महाराष्ट्र राज्यात पहिला कामगार लढा उभा करून शिरूर कासार तालुक्यात ऊसतोड कामगारांसाठी आंदोलन केले, असे ऊसतोड कामगारांचे प्रणेते माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे यांची ऊसतोड कामगारांच्या विविध मुद्द्यावर रविवारी पाथर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी आ.सुरेश धस यांनी भेट घेत त्यांच्याकडून अनेक जुन्या आठवडींना उजाळा देत ऊसतोड कामगारांच्या अनेक प्रश्नांना हात घातला.

यावेळी बबनराव ढाकणे यांनी ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांना पहिल्यांदा वाचा फोडण्याचं काम केले. कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व बीडचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी केले. बबनराव ढाकणे यांनी १९७४,७६,७८ साली संप घडवून आणला. त्यांच्यामुळेच त्यावेळी मजुरीत प्रतिटन ९ रुपये इतकी वाढ झाली. पुर्वी ५ रुपये प्रतिटन इतका दर होता तो आंदोलनामुळे १४ रुपये २५ पैसे इतका झाला.

त्यानंतर पुढे १९८६-८७ नंतर ढाकणेंच्या एकमुखी नेतृत्वातच कामगारांची संघटना सक्रिय झाली. १९९२ ला झालेल्या संपात २२ टक्के मजुरी दरवाढ मिळाली. मात्र, १९९५ ला तब्बल १९ दिवस कडकडीत संप होऊनही दरवाढ दिली गेली नाही. त्यानंतर १९९९ च्या संपात 25% दरवाढ मिळाली. त्यानंतर हे ऊसतोड्यांचे नेतृत्व गोपीनाथजी मुंडे यांच्याकडे आल्यानंतर मुंडे यांनी या वर्गासाठी अहोरात्र मेहनत घेतली. ते कामगारांच्या लढ्यासाठी शेवटपर्यंत लढत राहिल्याचे सांगत सद्यस्थितीत गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड मजुरांसाठी कोरोना काळात साखर कारखान्यावर अडकून पडलेल्या मजुरांना घरी सुखरूप आणण्याची जबाबदारी आ. सुरेश धस आपण घेतली होती. 

तिथून जो लढा आपण ऊसतोड मजुरांच्या न्याय्यहक्कासाठी देत आहात तो निश्चितच कौतुकास्पद असून गोपीनाथजी मुंडे यांच्या जाण्याने जी पोकळी या ऊसतोड मजुरांच्या बाबतीत निर्माण झालेली होती ती पोकळी तुमच्या माध्यमातून निश्चितपणे भरुन निघेल असा विश्वास व्यक्त करीत बबनराव ढाकणे यांनी आ.सुरेश धस यांचे कौतुक केले.No comments