Breaking News

मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवा - पंकजाताई मुंडे


कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे केले आवाहन ; शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उदघाटन

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा पूर्वीपासून   भाजपचाच आहे, आता तो पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.

   मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या सेव्हन हिल परिसरात सुरू करण्यात आलेल्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर,  निवडणूक प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डाॅ. भागवत कराड, आ. अतुल सावे, भाऊराव देशमुख, आ. मेघना बोर्डीकर, आ. रमेश कराड, आ. तानाजी मुटकळे, आ. राजेश पवार आदी यावेळी उपस्थित होते.

   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या की, या कार्यक्रमाला मी येणारच होते, विमानाचे तिकीट उपलब्ध नव्हते पण कसेही करून आलेच, त्यामुळे अफवांवर  विश्वास ठेवू नका. पक्ष जो उमेदवार देईल त्याला मेहनत घेऊन विजयी करायचे हे  लोकेनेते मुंडे साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत, त्यामुळे  बोराळकर यांना निवडून आणणे हे आमचे कर्तव्य आहे. हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचा होता आणि आता पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकावयाचा आहे, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मानपान विसरून एकदिलाने व जोमाने कामाला लागायचे आहे. बोराळकर यांनी देखील एकही क्षण व्यर्थ न घालवता सर्वांशी समन्वय साधून विजयश्री खेचून आणावी. विजय आपलाच होणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांचेसह मराठवाडयातील सर्व जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल


पंकजाताई मुंडे यांचे सकाळी औरंगाबाद विमानतळावर आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवार शिरीष बोराळकर यांनी रावसाहेब दानवे व पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी पदवीधरांच्या मेळाव्यास पंकजाताई मुंडे यांनी संबोधित केले.

No comments