Breaking News

देशव्यापी संप; बीडमध्ये जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव प्रा. सुशिलाताई मोराळे, कम्युनिस्ट पक्षाचे मोहन जाधव यांच्यासह अनेकांना अटक


बीड  : आज २६ नोव्हेंबरला देशव्यापी संप होत आहे. कामगार, शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण आणि इतर सामान्य जनता मोदी सरकार विरूद्ध २६ नोव्हेंबर रोजी रस्त्यावर उतरली आहे. या संपाला बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संप सुरू झाल्यावर बार्शी रोड येथे पोलिसांनी अनेक नेत्यांना अटक केली आहे. त्यात जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव प्रा. सुशिलाताई मोराळे, माकप कम्युनिस्ट नेते व डीवायएफआयचे राज्य सहसचिव मोहन जाधव, सुहास जायभाये, कुंडलिक खेत्री, संगीता दराडे, अनिता वडमारे, गजानन ससाने यांच्यासह अनेकांना अटक झाली होती.

विद्यार्थी व युवक या संपाचे समर्थन करण्यासाठी यात सहभागी घेतला. शिक्षण आणि रोजगाराच्या मागणीसाठी कामगार व शेतकऱ्यांसोबत विद्यार्थी व युवक या संपात सहभागी झाले. देशाच्या कामगार कायद्यांमध्ये आणलेल्या बेकायदेशीर बदलांच्या विरोधात, शेतकर्‍यांविरूद्धचा कायदा, शिक्षणाचे बाजारीकरण आणि बेरोजगारी या विरोधात होत असलेल्या लढाईत युवक आणि विद्यार्थी सहभागी झाले. याचाच एक भाग म्हणून बीडमध्ये जनता दल, माकप, डीवायएफआय, शेतकरी संघर्ष समिती, सीटू, एसएफआय, ऊसतोड कामगार संघटना सह अनेक कामगार संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला. त्याचदरम्यान शिवाजी नगर पोलिसांनी संपातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक केली होती.

या आहेत प्रमुख मागण्या 

केंद्र सरकारचे शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे आणि वीज विधेयक रद्द करा. प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिने दरमहा ७,५०० रु. केंद्र सरकारमार्फत द्या. प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिने दरडोई १० किलो धान्य केंद्र सरकारमार्फत मोफत द्या. कोरोना रोगराईतून सुटका व्हावी म्हणून सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सर्वत्र बळकट करा. पीक विमा योजना सर्वंकष करून तिचा फायदा विमा कंपन्यांना नव्हे, तर शेतकऱ्यांना द्या. कोरोना काळातील सर्व वीज बिले माफ करा व भरमसाठ वीज बिले आकारणे बंद करा. गरज असेल तेथे नवीन विद्युत कनेक्शन त्वरित द्या, महिला, दलित, आदिवासी यांवर अत्याचार करणाऱ्यांवर ताबडतोब कठोर कारवाई करा. यासह एसएफआय व डीवायएफआय या विद्यार्थी युवा संघटनांनी खालील मागण्या केल्या शिक्षणाचे खाजगीकरण आणि केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात वाढवणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरण - २०२० मध्ये आवश्यक सुधारणा करा. राज्यातील तरुणांना त्वरित रोजगार देण्यासाठी लवकर नोकरभरती काढा. काम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तरुणांना बेरोजगारी भत्ता द्या. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्वरित शैक्षणिक साहित्याचे वितरण करा.


1 comment: