Breaking News

डोका (हादगाव) खून प्रकरण : अत्यंत शिताफीने आणि गुप्तता पाळून केज पोलीसांनी आरोपीला केली अटकगौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे दि.२४ नोव्हेंबर रोजी आत्याच्या वर्ष श्राध्दाधासाठी सांगली येथून माहेरी आलेल्या एका ४२ वर्षीय महिलेचा गळा चिरून व दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. 

या बाबतची माहिती येते की, सांगली जिल्ह्यातील माधव नगर, सटाण्याचा मळा येथे आपल्या कुटुंबा सोबत राहणारी मीरा बाबुराव रंधवे ही महिला तिची आत्या गांधारी इनकर हिच्या वर्षश्रद्धासाठी डोका (हादगाव) येथे आली होती. तिचा दि.२५ नोव्हेंबर रोजी डोका ता. केज शिवारातील बोभाटी नदी शेजारील रामचंद्र भांगे यांच्या शेतातील तुरीच्या पिकात गळा कापून व चेहरा ओळखू येऊ नये म्हणून डोक्यात दगड घालून पूर्ण चेहरा चेंदामेंदा करून खून करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली होती. या वेळी तपासी पथकाला घटना स्थळावर एक मोबाईल आणि प्रेताजवळ कपडे खरेदी केलेल्या दोन पिशव्या आढळून आल्या त्या वरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून घटनास्थळावर आढळून आलेला मयत मीरा रंधवे हीचा मोबाईल व कपडे खरेदी केलेल्या पिशव्या वरील दुकानाच्या नावावरून तपासाला सुरुवात केली. त्या कपड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेज वरून मयत मीरा सोबत असलेल्या पुरुषाची माहिती घेतली. 

तसेच मयत मीरा ही मागील वर्षी काही दिवस तिच्या माहेरी डोका येथे राहत होती. तिच्या माहेरची परिस्थिती ही अत्यंत गरिबीची आणि हलाखीची होती त्यातच तिचे वडील हे मूकबधिर आहेत. त्याच बरोबर मयत मीराचा पती बाबुराव रंधवे हा एका गुन्ह्यात सांगली येथील कारागृहात  बंदिवासात आहे. मीराला तीन अपत्ये असून दोन मुली व एक मुलगा आहे आणि त्यातील एक लहान मुलगी ही सुद्धा मूकबधिर आहे. त्यामुळे ती डोका येथे माहेरी रहात असताना तिच्या मेव्हनी सोबत मस्साजोग येथील हॉटेलवर स्वयंपाक करण्यासाठी जात होती. त्यामुळे तिची व दयानंद गायकवाड याची ओळख झाली. त्या ओळखीतून दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. नंतर ती त्याला पैशाची मागणी करीत असे. अशी माहिती मिळाली आहे. 

दरम्यान मीराचा खून कुणी केला? का केला? तो कुणी कोण असावा? आणि त्याचा तपास कसा लावायचा ? असे अनेक प्रश्न केज पोलीसा समोर आ वासून उभे असताना. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अन्वेषण पथक आणि पोलिसांची टीम यांनी घटना स्थळ, मयत मीराच्या अंगावरील जखमा, शेजारी असलेल्या वस्तू, तिच्यात अंगावरील कपडे, दागिने या सर्व गोष्टींची बारकाईने तपासणी करून प्रत्येक बाबींचा तपशील घेत होते. तर काहीजण गुप्त पद्धतीने माहिती काढीत होते. तपासाच्या दृष्टीने अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रेताजवळ पडलेला तिचा मोबाईल हस्तगत केला आणि त्याच बरोबर प्रेताशेजारी केज येथील एका कपड्याच्या दुकानाचे नांव असलेल्या दोन पिशव्या होत्या व एका पिशवीत रेडिमेड नवे कपडे तर एकांत फुलांचा हार होता त्या पिशव्यांवर रक्ताच्या चिळकांड्या उडल्याचे रक्ताचे डाग होते. 

तपासी पथकाने त्या दोन पिशव्या व तिचा मोबाईल या दोन महत्त्वाच्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित केले. फोन मधील सर्व कॉल हिस्ट्री काढून त्याची नोंद घेतली. बिट जमादार अमोल गायकवाड व गुप्त वार्ता विभागाचे मतीन शेख यांनी केज येथील ज्या दुकानातून कपडे खरेदी केले त्या अभिजित कलेक्शन्स या कानडी रोड केज येथील कपड्याच्या दुकानाचा तपास घेतला. त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले. त्या फुटेजमध्ये मीरा सोबत एक पुरुष दिसत असून त्याच्या अंगात काळसर रंगाची पॅन्ट व पांढरा शर्ट होता.  या वरून मग पोलीसांनी त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली असता; तो व्यक्ती हा मस्साजोग येथील दयानंद भिमराव गायकवाड असल्याचे प्रयत्ना अंती स्पष्ट होताच क्षणाचाही वेळ न दवडता त्याच रात्री २:०० वा. अमोल गायकवाड आणि  शेख मतीन यांनी त्याला गाफील असतानाच ताब्यात घेतले. 

मात्र दयानंद पोलीसांना ताकास तूर लागू देत नव्हता. त्यामुळे पुन्हा पोलिसांनी केज ते डोका जाणारे सर्व रिक्षा चालक यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांना आणखी एक भक्कम पुरावा मिळाला तो म्हणजे सारूकवाडी येथील एका मालवाहू रिक्षाने ते दोघे ड्रायव्हर शेजारी बसून रात्री ७:३० च्या दरम्यान डोका येथे गेले होते. त्यांनी रस्त्यात चिंचोली येथे थांबून एका किराणा दुकानातून चहा पत्ती विकत घेतली व डोका येथे गेले. रिक्षा ड्रायव्हरने दयानंदला ओळखले तसेच तो वापरत असलेल्या मोबाईलचे टॉवर लोकेशन देखील डोका परिसरातील निष्पन्न झाले एवढा सगळा पुरावा मिळताच मग पोलीसांची खात्री पटली की मीराच्या खुनात दयानंदचाच हात आहे मग त्याला आरोपी करण्यात आले आणि सत्र न्यायालयाने त्याला तपासासाठी सात दिवसांची पोलीस  कोठडी सुनावली मग पोलीसांनी त्याला हिसका दाखविताच त्याने पोपटासारखा सर्व घटनाक्रम कथन केला. मयताचे चुलते त्रिंबक ईनकर यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ५०९/२०२० भा.दं.वि. ३०२ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३(३) (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनाचा पुढील तपास हा उपविभागीय पोलीस अधिकार भास्कर सावंत हे करीत आहेत.

दरम्यान एवढा गुंतागुंतीचा आणि कोणताही पुरावा नसताना आपल्या बुद्धी चातुर्याने केज पोलीसांनी मयत महिलेच्या प्रेतावर अंतिम संस्कार होण्यापूर्वीच मारेकऱ्याच्या हातात बेड्या ठोकल्या याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये आणि भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, पोलिस जमादार अमोल गायकवाड, हनुमंत गायकवाड, शेख मतीन, अशोक गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केजच्या तपास पथकाचे वैभव राऊत, पप्पू अहंकारे, शेख आणि कर्मचारी यांनी मेहनत घेतली.


No comments