Breaking News

सचिन ढवळे आमदार होत नाहीत, तोपर्यंत लग्न करणार नाही- पवन चौधरी


बीड : राज्यात सध्या पदवीधर निवडणुकीचे धमासान चालू आहे. बहुदा शांततेत पार पडणाऱ्या या निवडणुका सध्या अनेक कारणाने चर्चेत आहेत. अनेक निवडणुकीच्या काळात किंवा एरव्ही ही आपल्या लाडक्या नेत्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक कार्यकर्ते अनेक नवस, पन करत असतात. कोणी चप्पल घालायची सोडून देतो, कोणी शर्ट घालायचे सोडतो तर कोणी दाढी राखतो, नवस बोलतो. अनेकजण कपाळावर, हातावर नेत्याचे नाव गोंदवून घेतात, हेअर स्टाईल मध्ये छबी कोरतात. परंतु सध्या मराठवाडा पदवीधरसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून रिंगणात असलेले उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांच्या साठी एका उत्साही कार्यकर्त्याने एक वेगळी शपथ घेतली आहे.

ढवळे सर जोपर्यंत आमदार होत नाहीत तोपर्यंत आपण लग्न करणार नसल्याची शपथ बीड जिल्ह्यातील पवन चौधरी या युवकाने घेतली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाण्याचे धामणगाव येथील तो रहिवासी आहे. सदरील युवक हा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून तो प्रहार चे उमेदवार सचिन ढवळे यांचा कट्टर समर्थक व चाहता आहे.

पवन चौधरी हा युवक सध्या 24 वर्षाचा असून त्याला सध्या विविध ठिकाणावरून लग्नासाठी स्थळं येत आहेत परंतु आपल्या लाडक्या नेत्याला जोपर्यंत आमदार म्हणून पाहत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असा विडाच त्याने उचलला आहे. ढवळे यांच्या विचाराने तो प्रेरित झाल्याचे त्याने सांगितले, एवढंच नव्हे तर त्यांच्या प्रचार, प्रसारासाठी तो झपाटून कामाला ही लागला आहे. या घटनेने मराठवाडा परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
No comments